संदीप टूले
Daund News : केडगाव : दौंड तालुक्यातील एकेरीवाडी गावामधील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना अक्षरशः दारूच्या बाटल्या उचलण्याची वेळ आली असून, रोजच शिक्षणाच्या दारी तळीरामाच्या पार्ट्या जोरात सुरू आहेत.
शाळेच्या आवारात रोजच दारूच्या बाटल्या
शाळेच्या आवारात रोजच दारूच्या बाटल्या, त्यांच्या फुटलेल्या काचा, पाण्याच्या बाटल्या, गुटख्याच्या मोकळ्या पुद्या, दारूचे मोकळे झालेले फुगे, चकण्यासाठी वापरलेले साहित्य, अशा वस्तू गोळा करण्यातच शिक्षकांचा महत्त्वाचा वेळ वाया जात आहे. (Daund News ) ग्रामपंचायत व पोलिस प्रशासनाच्या नाकावर टिच्चून तळीरामांच्या पार्ट्या जोरात सुरू असून, या तळीरामामुळे शिक्षकांसह पालकही हतबल झाले आहेत. स्थानिक नेत्यांना व ग्रामपंचायतीला तर याचे काहीच सोईर सुतक उरलेले दिसत नाही. रोजच शाळेच्या मुख्य दारातच दारूच्या बाटल्याचे व फुटलेल्या काचाचे दर्शन होत असून, शाळेच्या वर्ग खोल्यात दारूचा उग्र वास येत असतो. या उग्र वासात शिक्षक व विद्यार्थ्यांना दिवस काढावा लागत असून, यामुळे आम्ही इथे शिक्षण घेतो हाच आमचा गुन्हा काय? असे विद्यार्थी नक्कीच विचारात असतील.
एकेकाळी याच जिल्हा परिषद शाळेकडे मोठ्या अभिमानाने पाहिले जायचे. कारण याच शाळेने अनेक हुशार विद्यार्थी घडविले आहेत. पण सध्या शाळेकडे कोणाचेच लक्ष नसल्यामुळे ही शाळा शेवटची घटका मोजत आहे.
शाळेत विद्यार्थ्यांची संख्याही अपुरी
शाळेत विद्यार्थ्यांची संख्याही अपुरी आहे. त्यात परिसरातील दारूड्यांनी उच्छाद मांडला असून, रोज शाळेच्या मुख्य दरवाज्याशेजारी व शाळेच्या आवारात अंधाराचा फायदा घेत ठिकठिकाणी दारूच्या पार्ट्या करून दारूच्या बाटल्या मैदानावर फोडून टाकत असल्याने त्या काचामुळे विद्यार्थ्यांच्या पायाला व हाताला मोठी इजा होऊ शकते. त्यामुळे याकडे ग्रामस्थांसह यवत पोलिस प्रशासनानेही गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. कारण हे तळीराम त्यांच्या नाकावर टिच्चून संध्याकाळ होताच अंधाराचा फायदा घेत शाळेच्या आवारात दारूच्या पार्ट्या रंगवत आहे. (Daund News ) अशा तळीरामावर शिक्षण विभागाकडून व पोलिस प्रशासनाकडून कठोर कारवाई केली. तरच या पार्ट्या बंद होतील. अन्यथा याचा त्रास विद्यार्थ्यांना व शिक्षकांना कायम होणार आहे. त्यामुळे याची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे.
ग्रामपंचायतीला माहिती देऊन कारवाई नाहीच
आम्ही ग्रामपंचायत कार्यालयामध्ये अनेक वेळा या प्रकाराची माहिती दिली होती. पण त्यावर अजून तरी काहीच फरक पडलेला दिसत नाही.
– गणेश शेलार, शिक्षक
तळीरामांकडून कॅमेराची मोडतोड
या प्रकाराची आम्ही दखल मागील महिन्यात घेतली होती. शाळेच्या आवारात कॅमेरे लावले होते. पण या तळीरामांनी त्याच्या वायरी तोडून टाकल्या व कॅमेराची नासधूस केली.
– नीलकंठ गायकवाड, ग्रामसेवक
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : दौंड तालुक्यात कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; निर्यात शुल्कवाढ रद्द करण्याची मागणी
Daund News : खुटबाव येथे जनरीक मेडिकल सुरू करणार – माजी आमदार रमेश थोरात