गणेश सुळ
Daund News : केडगाव : दौंड तालुक्यातील छोट्या-मोठ्या गावांमध्ये, वाडी-वस्तीवर सकाळ, सायंकाळ कावळ्यांची काव काव ऐकू येत असे. परिसरातील मोठ्या झाडांवर तर कावळ्यांची शाळाच भरायची. दोन ते तीन वर्षांपूर्वी दिसणारे हे चित्र आता दुर्मिळ झाले आहे. शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही कावळे अपवादानेच आढळतात. बेसुमार वृक्षतोडीमुळे पक्ष्यांना घरटी बांधण्यासाठी सुरक्षित जागा मिळणे सध्या दुरापास्त झाले आहे. यामुळे ही कठिण परिस्थिती उद्भवली आहे. परिणामी पितृपक्षात अन्नघास भरवायलाही कावळा मिळणे कठीण झाले आहे. पर्यावरणाच्या बदलत्या संतुलनाचा परिणाम कावळ्यांवर झालेला दिसून येत आहे.
पर्यावरणाच्या बदलत्या संतुलनाचा परिणाम
सप्टेंबरपासून पितृपक्षाला प्रारंभ झाला आहे. पितृपक्षात कावळ्यांना श्राद्ध भोजन खाऊ घालण्याचे विशेष महत्त्व आहे. गरुड पुराणात तर कावळ्यांना यमाचे प्रतीक मानले जाते. श्राद्ध भोजनाचा घास कावळ्याने ग्रहण केला तर पितरांच्या आत्म्याला शांती मिळते, असे मानले जाते. (Daund News) मात्र, गेल्या काही वर्षांत कावळ्यांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. वाढत्या बांधकामांमुळे झाडे तोडण्यात आली. पक्षांचा अधिवास नष्ट झाला. दौंड शहर, रेल्वे स्टेशन परिसर, कंपनीचे स्टावर परिसर, कुरकुंभ एमआयडीसी परिसरात गर्दीच्या भागात तर कावळ्यांसह इतर पक्षीही दिसेनासे झाले आहेत. त्यामुळे पितृपक्षात अन्नघास भरवण्यासाठी कावळ्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे.
तालुक्यातील मुळा-मुठा, भीमा नदीकाठी मोठ्या वृक्षांची संख्या जास्त असते. तेथे कावळे दिसून येतात. त्यामुळे तालुक्यातील दशक्रिया विधी कार्यक्रम नदीकाठी आखला जातो. बांधकामांसाठी शहरासह, ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे. (Daund News) त्यामुळे कावळ्यांसह पक्ष्यांची कमी होत चाललेली संख्या चिंताजनक आहे. पितृपक्षात नैवेद्य खाण्यासाठी कावळ्याची प्रतीक्षा करत अखेर पूर्वजांचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा लागत आहे.
हॉटेल व्यवसायात जवळपास ३० वर्षांपेक्षा जास्त काळ मी काढला आहे. सकाळी हॉटेल चालू करताना मोठ्या भांड्यात पाणी व पेपरवर शेव, पापडी, मुरमुरा असे पदार्थ कावळ्यांसाठी ठेवायचो. शाळा परिसरात मोठ-मोठी निलगिरीची झाडे असल्याने १०० हून अधिक कावळे ते खायला यायचे. परंतु मागील दोन वर्षांपासून १० कावळे सुद्धा येत नाहीत. यासाठी मोठ्या झाडाची लागवड व संगोपन केले पाहिजे. (Daund News) आमच्या देलवडी गावात आईचे बन नावाने जवळपास १००० हून अधिक झाडे लावली आहेत. त्यामुळे कावळ्यांच्या संख्येत वाढ होऊन माझा नित्यक्रम सुरू होण्याची अपेक्षा आहे.
– हरिभाऊ सावंत, हॉटेल व्यावसायिक व पक्षी अभ्यासक
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :