दौंड (पुणे) : दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलांच्या छेडछाडीसह पोस्कोचा गुन्हा दाखल असलेल्या ३ फरार आरोपींना दौंड पोलिसांनी अटक केली आहे.
राकेश ऊर्फ रोहित विजय गुळीग (रा. वडारगल्ली, ता. दौंड), महेश दिलीप रंधवे (रा. मलठण, ता. दौंड), लॉरेन्स विल्यम विश्वास (रा. वेताळनगर दौंड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर दौंड पोलीस ठाण्यात छेडछाडीसह पोस्कोचा गुन्हा दाखल आहे.
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राकेश उर्फ रोहित गुळीग, महेश दिलीप रंधवे, लॉरेन्स विश्वास याच्याविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात छेडछाड व पोस्कोचा गुन्हा दाखल होता. या गुन्हातील आरोपी गुन्हा घडल्यापासून फरार होते. गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी याबाबत विशेष मोहीम राबवून महिलांची छेडछाड व त्रास देणाऱ्या फरार आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
दरम्यान, दौंड पोलिसांनी अल्पवयीन मुलींची छेडछाड करणाऱ्या या फरार आरोपींना अटक केली असून, यातील दोन आरोपींना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार सुभाष राऊत, नितीन बोराडे, शरद वारे, विशाल जावळे, आदेश राऊत, अमोल देवकाते आदींनी केली आहे. या घटनांचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया दुरंदे या करीत आहेत.