दौंड : दौंड तालुक्यातील वरवंड गावात एका 33 वर्षीय व्यक्तीचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शैलेंद्र कुमार विमल (वय 33 ) असे मृत व्यक्तीचे नाव असून, तो वरवंड परिसरात भंगार गोळा करण्याचा व्यवसाय करत होता.

ही घटना बुधवारी (6 ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास घडली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सकाळच्या वेळी स्थानिक नागरिकांना एका शेतामध्ये मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली.

डोक्यात दगड घालून हत्या
शैलेंद्र कुमार याचा मृतदेह शेतात सापडला असून, त्याच्या डोक्यावर मोठ्या दगडाने मारण्यात आल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ही हत्या पूर्वनियोजित असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

मूळचा उत्तरप्रदेशचा, स्थायिक वरवंडमध्ये
शैलेंद्र कुमार हा मूळचा उत्तरप्रदेशातील रहिवासी असून, तो गेल्या अनेक वर्षांपासून वरवंड परिसरात वास्तव्यास होता आणि भंगार गोळा करण्याचा व्यवसाय करीत होता.
पोलिसांकडून तपास सुरू
या घटनेमुळे वरवंड परिसरात खळबळ उडाली असून, दौंड पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत तपास सुरू केला आहे. खून कोणत्या कारणाने झाला? त्यामागे कोण आहेत? याचा तपास सुरू असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून, मृतदेहाचे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.







