दौंड: पुण्यातील दौंडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. दौंड पोलीस ठाणे हद्दीतील भीमनगर येथे एका लहान मुलीचा विनयभंग करून जातिवाचक शिविगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. बाबा चांद शेख ( रा. भीमनगर, दौंड ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 9 एप्रिल ला रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पीडित मुलीची आई गवळी वस्ती येथून घरी भीमनगर येथे त्यांच्या घरासमोर जात असताना घरासमोर थांबलेल्या व शेजारी राहणाऱ्या बाबा चांद शेख याने लहान मुलीला वाईट हेतूने मिठी मारली. हा सर्व प्रकार फिर्यादीने पाहिला. तेव्हा पीडित मुलगी घाबरून रडत रडत दोन्हीं हाताने शेखला विरोध करीत होती. हे पाहताच फिर्यादी बाबा, तिला सोड असे म्हणत जोरात ओरडल्या.
दरम्यान यावेळी आरोपीने जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन तो तिथून पसार झाला. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी बाबा शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पुढील तपास विभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस हे करीत आहेत.