उरुळी कांचन, (पुणे) : पुणे – सोलापूर महामार्गालगत तसेच दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात जाहिरातींचे अनधिकृत होर्डिंग मोठ्या प्रमाणात लावण्यात आले आहेत. यामुळे रस्त्यावरून ये-जा करणारे पादचारी व वाहनचालक यांच्या जीवाला अपघाताचा धोका वाढला असून पूर्व हवेली परिसरात विद्रुपीकरण झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे किंवा अन्य कारणामुळे होर्डिंग कोसळल्यास जीवितहानी होण्याचा धोका आहे.
अनधिकृत जाहीरात फ्लेक्सवर स्थानिक ग्रामपंचायत व पोलीस प्रशासन कारवाई करत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे घाटकोपर येथील एका पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता. १३) दुपारच्या सुमारास घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्य झाला आहे. तर ७५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. त्यामुळे अशा प्रकारची दुर्घटना पुणे-सोलापूर महामार्गावर घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोठी दुर्घटना घडली की, तेवढ्यापुरतीच चर्चा होते आणि काही दिवसांतच विषय थंड पडतो.
राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूस लावण्यात आलेले होर्डिंग्ज प्रवाशांसाठी अडचणीचे ठरत असून, या होर्डिंग्जमुळे प्रवाशी, पादचारी यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर हडपसर ते उरुळी कांचन या परिसरात असंख्य अनधिकृत फ्लेक्स व होर्डिंग्ज धोकादायकरित्या लावलेले आहेत. या होर्डिंगखाली पान टपरी, रसवंतीगृह, खाद्य पदार्थ, उत्पादन विक्रीचा स्टॉल, वडा पाव विक्रीचा स्टॉल तसेच लहान मोठी हॉटेल्स आहेत.
या होर्डिंगच्या सावलीचा नागरिक आसरा घेत असतात. त्यामुळे या परिसरात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अनधिकृत होर्डिंग्जवर प्रशासन कारवाई करणार का? एखादी दुर्घटना घडल्यावरच प्रशासनाला जाग येणार? असा सवाल स्थानिक नागरिकांनी केला आहे.
दरम्यान, व्यावसायिक, कंपन्या, शैक्षणिक संस्था, क्लासचालक, राजकीय पुढारी यांचे कार्यक्रम व इतर उपक्रमाच्या जाहिरातींसाठी चौकांमध्ये तसेच रस्त्यावर होर्डिंगला प्राधान्य देतात. यातून होर्डिंग व्यावसायिकाला महिन्याला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. दरम्यान, अनधिकृत होर्डिंग कोसळून दुर्घटना घडल्यास या कामात दिरंगाई करणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी व अनधिकृत होर्डिंग उभारण्यासाठी जागा भाड्याने देणारे जागा मालक यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
याबाबत बोलताना भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे मुख्य अभियंता रोहन जगताप म्हणाले, “जानेवारी महिन्यात होर्डिंग्ज काढण्यात आले आहेत. तरी काही नागरिकांनी पुन्हा नव्याने त्या ठिकाणी होर्डिंग्ज लावले आहेत. पुणे – सोलापूर महामार्गावरील अनधिकृत होर्डिंग्ज काढण्याच्या सूचना ज्या त्या मालकांना व व्यावसायिकांना देण्यात आल्या आहेत. तसेच न काढल्यास पुढील ४ ते ५ दिवसात कार्यवाही करण्यात येणार आहे.
याबाबत बोलताना उरुळी कांचनचे सरपंच भाऊसाहेब कांचन म्हणाले, “उरुळी कांचन व परिसरातील काही होर्डिंग हे अनधिकृत आहेत. त्यांना फोन करून माहिती देण्यात आली आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने होर्डिंग असलेल्या जागा मालकांना नोटीस देण्यात येणार आहे.”
याबाबत बोलताना सामाजिक कार्यकर्ते रतिकांत यादव म्हणाले, “पुणे – सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन परिसरात अनधिकृत होर्डिंगची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यावर संबंधित विभागाने सर्वच्या सर्व होर्डिंगवर तात्काळ कारवाई केली पाहिजे. महामार्गाच्या बाजूला असलेल्या जागा मालकांमध्ये वरचढ सुरु असून पादचारी व वाहनचालक यांच्या जीवाला या अनधिकृत फ्लेक्समुळे अपघाताचा धोका वाढला असून परिसराला विद्रुपीकरण झाले आहे”