पुणे : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पुण्यातील सुप्रसिद्ध दगडूशेठ गणपतीसमोर तब्बल ४५१ प्रकारचे मिष्टान्न अर्पण करण्यात आले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने मंदिरामध्ये अन्नकोट आयोजित करण्यात आला होता. पुणेकरांनी अन्नकोट पाहण्यासाठी सकाळपासूनच मोठ्या संख्येने मंदिरात गर्दी केली होती.(Shrimant Dagdusheth Ganpati)
फराळाचे तिखट-गोड पदार्थ तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाया, फळे व भाज्या अशा तब्बल ४५१ पदार्थांचा महानैवेद्य श्रीमंत दगडूशेठ गणपतीसमोर रविवारी दाखविण्यात आला. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी ट्रस्टचे विश्वस्त, कार्यकर्ते उपस्थित होते.
या उपक्रमाबाबत ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण म्हणाले की, त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त अन्नकोटासाठी पदार्थ देण्याचे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले होते. त्यानुसार तब्बल ४५१ हून अधिक प्रकारचे पदार्थ भाविकांकडून मंदिरात गोळा झाले. ते सर्व पदार्थ गणरायासमोर मांडण्यात आले. या सर्व पदार्थांचा प्रसाद मंदिरातील भक्तांना देण्यात येणार आहे.