पुणे : आजकाल अनेक प्रकारे सर्वसामान्यांची फसवणूक होत अससते. अशीच एक फसवणूक पुण्यातील येरवडा परिसरातील एका महिलेची झाली. गॅस एजन्सीमधून बोलत असल्याचे भासवून महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार येरवडा परिसरात घडला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी शनिवारी (दि. ६ जानेवारी) अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.
महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, भारत गॅस एजन्सीला काही कारणास्तव संपर्क करण्यासाठी महिलेने कस्टमर केअर नंबर गुगलवर शोधला. एका पेजवर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर महिलेने फोन केल्यावर आम्ही भारत गॅस एजेन्सीमधून बोलत आहोत असे सांगण्यात आले. महिलेने तक्रार नोंदवण्यासाठी फोन केल्याचे सांगितल्यावर तुमची अडचण दूर करण्यासाठी एक लिंक पाठवत आहोत. त्यावर क्लिक करून अप्लिकेशन डाउनलोड करा असे समोरच्याकडून सांगण्यात आले.
महिलेने अप्लिकेशन डाउनलोड केल्यावर त्यांच्या मोबाईलचा संपूर्ण ऍक्सेस गुन्हेगार व्यक्तीला मिळाला. अडचण दूर करण्यासाठी १० रुपये भरा असे सांगण्यात आल्यावर महिलेच्या बँक खात्याची खासगी माहिती चोरली. खासगी माहितीचा वापर करून महिलेच्या बँक खात्यातून ६ लाख ५० हजार रुपये परस्पर ट्रान्स्फर करण्यात आले. हो महिलेच्या लक्षात आल्यावर महिलेने याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक कांचन जाधव या करत आहेत.