लोणीकंद, (पुणे) : मुंबई नार्कोटिक्स डिपार्टमेंटमधून बोलत असल्याचे सांगून तैवानला पाठविण्यात आलेल्या पार्सलमध्ये एमडी ड्रग्स सापडल्याची भिती दाखवत सायबर चोरट्यांनी वाघोलीतील एकाला सुमारे १० लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी फिर्यादींच्या मोबाईलवर आयव्हीआर फोन करून फेडेक्समधून बोलत असल्याचे सांगितले. तुम्ही मुंबईतून तैवानला पाठविलेल्या पार्सलमध्ये एमडी ड्रग्स सापडल्याने गुन्हा दाखल असल्याचे सांगितले. तसेच फिर्यादीने पुण्यात असल्याचे सांगितल्यानंतर स्काईपवर व्हिडीओ कॉल करून या गुन्ह्यात आरोपी करण्याची भीती दाखविण्यात आली.
दरम्यान, फिर्यादीचे आधार कार्ड, पॅन कार्ड घेऊन तुमचे दहशतवाद्यांशी संबंध आहेत, अशी भीती दाखवून 10 लाख रुपये ट्रान्स्फर करण्यास सांगितले. फिर्यादीने सदरची रक्कम ट्रान्स्फर केली. फिर्यादी यांना आपली फसवणूक झाल्याची लक्षात येताच त्यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.