पुणे: पुण्यात यंदा गणेश विसर्जन मिरवणूक एक तास लवकर सुरू झाली असली तरी, ती आज दुपारी 3 वाजेपर्यंत संपेल अशी शक्यता आहे. दोन मंडळांमधील लांबलेलं अंतर आणि मिरवणुकांची संथ गती रात्री 1 वाजेपर्यंत कायम होती. विशेष म्हणजे, रात्री उशिरापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा गणेशभक्तांची मोठी गर्दी होती.

गणपती विसर्जन मिरवणुकीची सुरुवात दांडेकर पुलावरील आझाद मित्र मंडळाच्या मिरवणुकीने झाली, जी दुपारी 1:30 वाजता ग्राहकपेठ चौकात दाखल झाली. दरम्यान, डीजेचा दणदणाट, आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांनी सजवलेले रथ, तसेच हिंदी गाण्यांवर नाचणारी तरुणाई हे दृश्य बहुतांश मिरवणुकींमध्ये पाहायला मिळाले.

रात्री 8 नंतर गणेशभक्तांची गर्दी वाढली. नवी पेठेतील शिवांजली मित्र मंडळाची मिरवणूक 8:15 वाजता ग्राहकपेठ चौकात बराच वेळ थांबली. त्यानंतर रात्री 10 वाजता लक्ष्मीनगरच्या साई मित्र मंडळ आणि 11 वाजता टिळक रोडवरील एकता मित्र मंडळाच्या ढोल पथकांनी सर्वांना खिळवून ठेवले.

गेल्या काही वर्षांतील आकडेवारीनुसार, टिळक रोडवरील मिरवणुकांचा कालावधी 2022 साली गणेश विसर्जन मिरवणूक एकूण 31 तास चालली होती. त्यानंतर 2023 मध्ये हा कालावधी कमी होऊन 30 तास 25 मिनिटे झाला. गेल्या वर्षी, म्हणजेच 2024 मध्ये, मिरवणूक आणखी लवकर संपली आणि तिचा कालावधी 28 तास 45 मिनिटे नोंदवला गेला. यंदाची मिरवणूक सकाळी 9:30 वाजता सुरू झाली असून, सध्याची गती पाहता, ती दुपारी 3 वाजेपर्यंत संपण्याची शक्यता आहे.







