जळगाव: यावल येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गेल्या अनेक तासांपासून बेपत्ता असलेल्या एका 6 वर्षांच्या मुलाचा मृतदेह शेजारील घरात सापडला आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या जमावाने संबंधित व्यक्तीच्या घराची आणि दुकानाची तोडफोड केली, ज्यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे.

मृत बालकाचे नाव हन्नान खान (वय 6) असे आहे. तो शुक्रवारी संध्याकाळी घराजवळ खेळत असताना अचानक बेपत्ता झाला होता. कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, पण तो कुठेच सापडला नाही.

मृतदेह बंदिस्त कोठीत सापडला

शनिवारी सकाळी, शेजारी राहणाऱ्या बिस्मिल्ला खलिफा यांच्या घरातील दुसऱ्या मजल्यावर एका बंदिस्त कोठीत हन्नानचा मृतदेह आढळला. हा धक्कादायक प्रकार समोर येताच परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला. संतप्त झालेल्या जमावाने बिस्मिल्ला खलिफा यांच्या घरावर आणि दुकानावर दगडफेक करत तोडफोड केली.
यामुळे यावल येथील बाबूजी पुरा परिसरात तणाव वाढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला असून, परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
या प्रकरणाची पोलीस सखोल चौकशी करत आहेत. हन्नानसोबत नेमकं काय घडलं आणि त्याचा मृतदेह अशाप्रकारे का लपवला होता, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या धक्कादायक घटनेमुळे यावल शहरात शोक आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली असून, यामागील सत्य लवकरच समोर येईल.







