पुणे : बेकायदेशीररीत्या पिस्टल बाळगणा-या गुन्हेगारास पुणे शहर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकने कर्वेनगर परिसरातील भुजबळ बंगल्याच्या परिसरातून अटक केली आहे. सुरज रोहिदास खंडागळे (वय ३०, रा. म्हाडा कॉलनी, २०६ एच बिल्डींग वारजे, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथक १ मधील पोलीस अंमलदार विजय कांबळे, प्रफुल्ल चव्हाण हे कर्वेनगर परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी एक इसम भुजबळ बंगल्याच्या बाजूस मोकळ्या मैदानात पिस्टल बाळगून थांबला असल्याची माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून आरोपीला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कंबरेला १ देशी बनावटीचे पिस्टल आणि २ जिवंत काडतुसे आढळून आली. त्याच्यावर आर्म अॅक्टनुसार अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील, पोलीस अंमलदार विजय कांबळे, प्रफुल्ल चव्हाण, अमर पवार, नितीन कांबळे, रविंद्र फुलपगारे, प्रविण ढमाळ, संजय भापकर आणि अमोल आवाड यांच्या पथकाने केली आहे.