पुणे : पुणे पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ चारच्या हद्दीतील येरवडा पोलीस ठाण्यातील तडीपार सराईत गुन्हेगार एम सी स्माईली ऊर्फ इस्माईल शेख याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोनने अटक केली आहे. राजीव गांधी नगर येथे गुरुवारी (ता. २३) ही कारवाई केली.(Yerwada Police Station)
परिमंडळ- ४ पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी पुणे पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड आयुक्तालय आणि पुणे जिल्ह्यातून येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार एम सी स्माईली ऊर्फ इस्माईल शेख याला तडीपार केले होते. दरम्यान, गुरुवारी दरोडा व वाहन चोरी पथक २ चे पथक येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलींग करीत होते.
त्यावेळी पोलीस अंमलदार दत्तात्रय खरपुडे व गणेश लोखंडे यांना माहिती मिळाली की, येरवडा पोलीस ठाण्यातील तडीपार गुन्हेगार एम सी स्माईली ऊर्फ इस्माईल शेख हा राजीव गांधी नगर, येरवडा येथे येणार आहे.
पथकाने राजीव गांधी नगर परिसरात सापळा रचून आरोपी शेख याला ताब्यात घेतले. त्याच्यावर मुंबई पोलीस अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली आहे.