पुणे : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी तसेच शिक्षणाचे माहेरघर अशी बिरूदावली मिरवणाऱ्या पुण्यात शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी खळबळजनक घटना घडली आहे. महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला कॉलेजच्या स्टाफरुमध्ये बोलावून ‘तुला किस पाहिजे का?’ अशी विचारणा चक्क एका शिक्षकानेच केल्याचे उघड झाले आहे.
अश्लील भाषेत बोलून मुलीचा विनयभंग करणाऱ्या या नराधम शिक्षकाविरोधात वानवडी पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन, अटक केली आहे. हा प्रकार १५ जून २०२३ ते २७ जानेवारी २०२४ या कालावधीत वानवडी येथील एका महाविद्यालयात घडला. याबाबत अल्पवयीन मुलीने मंगळवारी (ता. ३०) वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन रमेश किसन चव्हाण (वय ३२, रा. भेकराईनगर, हडपसर) याच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी वानवडी येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेते. त्याच महाविद्यालयात आरोपी रमेश चव्हाण हा शिक्षक आहे. आरोपीने पीडित तरुणीच्या मोबाईलवर वारंवार ‘आय लाईक यु’, ‘आय लव यू’ असे मेसेज पाठवले होते. याशिवाय संबंधित विद्यार्थिनीला व्हिडिओ कॉल करुन तिच्यासोबत अश्लील भाषेत बोलून मानसिक त्रास दिला.
आरोपी एवढ्यावरच न थांबता तरुणीला सातत्याने त्रास देत होता. आरोपीने तरुणीला कॉलेजमधील शिक्षकांच्या स्टाफ रुममध्ये बोलावून घेतले. पीडित तरुणी स्टाफ रुममध्ये आली असता ‘किस पाहिजे का’ अशी विचारणा करुन मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष गायकवाड करीत आहेत.