Crime News: सांगली: राज्यात हुंडाबळी काही थांबेना असातच, मिरज येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. मिरज तालुक्यात लग्न ठरून सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतर अवघ्या चार दिवसांवर असताना वराकडून मोठ्या रकमेची मागणी झाल्याने लग्न मोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर मानसिक तणावात असलेल्या तरुणीने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित तरुणीवर सध्या मिरज सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती मिळाली आहे.
मिरज येथील बी. फार्मसी पदवीधर तरुणीचा पुण्यात अभियंता म्हणून काम करणाऱ्या तरुणाशी सुमारे 6 महिन्यांपूर्वी विवाह ठरला होता. दोघांचा साखरपुडा मोठ्या थाटात पार पडला होता. साखरपुड्यानंतर भावी पतीने तरुणीला नोकरी सोडण्यास सांगितल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. तसेच मानपान आणि इतर कारणांसाठी वराकडील मंडळींनी वेळोवेळी सुमारे 6 लाख रुपये घेतल्याचेही सांगण्यात आले आहे. विवाह दिनांक 28 रोजी होणार होता.
मात्र लग्नाच्या काही दिवस आधी वराकडून अचानक 20 लाख रुपये रोख आणि 10 तोळे सोन्याची मागणी करण्यात आली. एवढी मोठी रक्कम देणे शक्य नसल्याने तरुणीच्या वडिलांनी विवाहास नकार दिला. यानंतर त्यांनी साखरपुडा आणि मानपानासाठी दिलेले सुमारे 6 लाख रुपये परत देण्याची मागणी केली. मात्र वराने ती रक्कम परत देण्यास नकार दिल्याने प्रकरण गांधी चौक पोलीस ठाण्यात पोहोचले.
दरम्यान, लग्न मोडल्याने तरुणी मानसिक तणावात होती. या अवस्थेत तिने मामाच्या घरी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. घटनेपूर्वी तिने एक चिठ्ठी लिहिली असून माझ्या आत्महत्येस होणारा पती आणि त्याचे पालक जबाबदार असल्याचे त्यात नमूद केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून हुंडा मागणी आणि फसवणुकीच्या आरोपांबाबत चौकशी सुरू आहे.







