Sport News : भारतीय महिला क्रिकेट विश्वात सध्या एकाच नावाची चर्चा आहे, ती म्हणजे स्फोटक सलामीवीर शफाली वर्मा. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात शफालीने अशा काही थाटात फलंदाजी केली की, तिने दिग्गज फलंदाज स्मृती मानधनाला एका खास बाबतीत मागे टाकले आहे. केवळ विजयच नाही, तर एका मोठ्या विक्रमाला गवसणी घालत शफालीने भारतीय क्रिकेटमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. (Sport News)

विशाखापट्टणमच्या मैदानावर श्रीलंकेने विजयासाठी ठेवलेले १२९ धावांचे लक्ष्य गाठताना शफालीने मैदानावर चौफेर फटकेबाजी केली. तिने अवघ्या २७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. शफालीने ३४ चेंडूत नाबाद ६९ धावा ठोकल्या, ज्यात ११ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता. तिच्या या वादळी खेळीमुळे भारताने विजयाचे लक्ष्य केवळ १२ व्या षटकातच गाठले आणि मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.
या सामन्यात मिळालेल्या ‘सामनावीर’ (Player of the Match) पुरस्कारामुळे एका नव्या वादाला आणि चर्चेला तोंड फुटले आहे. शफालीचा हा ८ वा सामनावीर पुरस्कार ठरला. यासह तिने अनुभवी स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्स यांना पिछाडीवर टाकले आहे. स्मृती आणि जेमिमा यांच्या नावावर प्रत्येकी ७ पुरस्कार आहेत. स्मृती मानधनाने १५५ सामन्यात ७ पुरस्कार मिळवले असताना, शफालीने अवघ्या ९२ व्या सामन्यात हा टप्पा ओलांडला आहे, जो स्मृतीसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे.
या विजयात गोलंदाजांनीही चोख भूमिका बजावली. श्रीलंकेला १२८ धावांवर रोखण्यात वैष्णवी शर्मा आणि श्री चरणी यांना यश आले. आता सर्वांचे लक्ष २६ डिसेंबर रोजी तिरुअनंतपुरम येथे होणाऱ्या तिसऱ्या सामन्याकडे लागले आहे, जिथे भारत मालिका खिशात घालण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. (Sport News)







