Crime News : सोलापूर : शहरात माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ घरगुती वादातून एका पतीने पत्नीवर पेट्रोल टाकून तिला जाळल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. या घटनेत नर्गिस शेख ही महिला गंभीररीत्या भाजली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

ही घटना सोलापूर शहरातील विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. नर्गिस शेख आणि तिचा पती फैजान जावेद शेख यांच्यात काही दिवसांपासून घरगुती कारणावरून वाद सुरू होते. गुरुवारी हा वाद तीव्र झाला. रागाच्या भरात आरोपी पतीने घरातच पेट्रोल आणून पत्नीच्या अंगावर ओतले आणि तिला पेटवून दिल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर काही क्षणातच नर्गिस आगीच्या ज्वाळांनी वेढली गेली. तिच्या आरडाओरडीनंतर शेजाऱ्यांनी तातडीने मदत केली.
स्थानिक नागरिकांनी तिला त्वरित जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांकडून तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून पुढील कारवाई सुरू केली.
या प्रकरणी विजापूर नाका पोलिसांनी आरोपी फैजान जावेद शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास सुरू आहे. घरगुती वादातून हा प्रकार घडला असला तरी यामागे आणखी काही कारणे आहेत का, याचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे सोलापूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.







