उरुळी कांचन, (पुणे) : हवेली तालुक्यातील बिवरी गावात मंगळवारी (ता. ०२) मध्यरात्री सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. दरोडेखोरांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवत तब्बल १६ लाख ३० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने रोख रक्कम लुटली आहे. मंगळवारी मध्यरात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. या सशस्त्र दरोड्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली असून पोलिसांपुढे या दरोडेखोरांना गजाआड करण्याचे आव्हान उभे राहीले आहे.
याप्रकरणी प्रशांत विलास गोते (वय ४०, रा. मु. बिवरी, पो. नायगाव, ता. हवेली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात दरोडेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास करे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोते आणि त्यांचे कुटुंबीय रात्री जेवण करून घरामध्ये झोपलेले होते. मध्यरात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास सात अनोळखी व्यक्ती त्यांच्या घराजवळ आल्या. त्यांनी मुख्य प्रवेशद्वाराचा दरवाजा कटावणीने उघडला व हत्यारांसह घरामध्ये प्रवेश केला.
या सर्व आवाजामुळे घरातील लोक जागे झाले. या सर्वांच्या गळ्याला चाकू लावून त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर घरातील बेडरूममधील कपाटात असलेली पाच लाख रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले. यासोबतच फिर्यादी गोते यांची पत्नी, आई, बहीण यांच्या गळ्याला चाकू लावून त्यांचा गळा कापण्याची धमकी दिली. गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले. तसेच, ओढून काढले. त्यांच्या बहिणीला मारहाण करण्यात आली. आईला तोंडावर जबर मारहाण करून कानाला आणि तोंडाला दुखापत करण्यात आली.
दरम्यान, दरोडेखोरांनी एकूण १६ लाख ३० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड दरोडा घालून चोरून नेली. पळून जात असताना चोरट्यांनी पोलिसांना फोन करू नये म्हणून फिर्यादी यांच्या घरातील सर्वांचे फोन घेऊन ते फोडून टाकले. त्यानंतर, आरोपी पसार झाले.