वाघोली, (पुणे) : वारंवार होणाऱ्या भांडणाच्या कारणावरून स्वतःच्या मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी नराधम बापास गुन्हे शाखा युनिट ६ च्या पोलिसांनी अवघ्या तीन तासात हडपसर गाडीतळ परिसरातून अटक केली.
फकीरा गुंडा दुपारगुडे (वय ४५, रा. वाघोली सरकारी हॉस्पिटलजवळ, नगर रोड, वाघोली पुणे) असे खून केलेल्या नराधम बापाचे नाव आहे. तर अक्षदा फकीरा दुपारगुडे (वय १६, रा. सदर) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाठीमागे फकीरा दुपारगुडे याने राहत्या घरी त्याच्या १६ वर्षीय मुलीचा धारदार शस्त्राने सपासप वार करुन निर्घृण खून केला व त्या ठिकाणावरून पळून गेला होता. याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट-६ चे अधिकारी व अमंलदार करत असताना फकीरा गुंडा दुपारगुडे हा गाडीतळ, हडपसर पुणे येथे थांबला असल्याची खात्रीशीर माहिती बातमीदारामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने गाडीतळ परिसरात एक इसम संशयितरित्या हालचाली करताना सोलापूरकडे बसमधून जाण्याच्या तयारीत दिसला. तेव्हा पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे नाव पत्ता विचारता तेव्हा त्याने त्याचे नाव फकीरा गुंडा दुपारगुडे असे असल्याचे सांगितले.
दरम्यान, त्याच्याकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता मुलगा व पत्नी घरात नसताना माझी मुलगी अक्षदा हिच्यासोबत दारु पिण्याच्या कारणावरुन वाद झाला. त्यामुळे धारदार कोयत्याने सपासप वार करुन तिला जिवे ठार मारल्याचे सांगितले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
ही कामगिरी युनिट ६ चे पोलीस निरीक्षक उल्हास कदम, पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, पोलीस अंमलदार विठ्ठल खेडकर, बाळासाहेब सकटे, नितीन मुंडे, प्रतिक लाहीगुडे, सचिन पवार, ऋषिकेश व्यवहारे, नितीन धाडगे व ज्योती काळे यांनी केली.