खडकवासला: आधार कार्ड नसल्यामुळे खडकवासला येथील आदिवासी कातकरी नागरिकाचा मृतदेह १४ तास पडून राहिला. त्यामुळे प्रशासनाच्या कारभाराविषयी नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. दत्ता बबन जाधव (वय ६५) या कातकरी नागरिकाचा मंगळवारी (दि. २५ मार्च) रात्री मृत्यू झाला होता. जगण्याने छळले होते, मरणाने पण नाही केली सुटका, अशी परिस्थिती या समाजातील नागरिकांची प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे झाली आहे.
कातकरी वस्तीत राहणारे दत्ता जाधव यांच्या मृत्यूनंतर सकाळी नातेवाईक जमले. मात्र, मृत्यूचा दाखला नसल्याने अंत्यसंस्काराचे सामान मिळाले नाही. आधार कार्ड नसेल, तर आम्ही दाखला कसा देऊ असे खडकवासला येथील डॉक्टर म्हणू लागले. आधारकार्ड नसल्याने मयताचे नातेवाईक हतबल झाले होते. खडकवासला येथील शांताराम मते, विजय मते, सौरभ मते या नागरिकांनी तहसीलदार किरण सुरवसे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांच्याशी सरपंच सौरभ मते यांनी संपर्क साधल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अशोक गायकवाड यांनी पथकासह कातकरी वस्तीवर दाखल झाले. तहसीलदार किरण सुरवसे यांच्या सूचनेनुसार खडकवासल्याचे मंडळ अधिकारी हिंदूराव पोळ, तलाठी रवी फणसे यांनी पंचनामा केल्यावर अखेर अंत्यसंस्कार पार पडला.
शिबिर घेऊन कागदपत्रे उपलब्ध करून देणार
आदिवासी कातकरी समाजातील नागरिक कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतात. या नागरिकांसाठी शासनातर्फे वेळोवेळी आवश्यक असलेल्या कागदपत्रांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात येते. आवश्यक कागदपत्रांची त्यांच्याकडून जपणूक करून ठेवली जात नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवरील महसूल अधिकाऱ्यांना या कागदपत्रांची जपणूक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या नागरिकांकडे वयाचा व जातीचा पुरावा नसला तरी, आपण शिबीर घेऊन या कागदपत्रांची पूर्तता करत असतो. अशी कागदपत्रे नसलेल्या नागरिकांनाही आपण शिबिरातून ती उपलब्ध करून देणार आहे, असे हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे यांनी सांगितले.