इंदापूर : इंदापूर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सातारा जिल्ह्यातून गोखळी गावच्या हद्दीत मेंढ्या चारण्यासाठी आलेल्या दांपत्याचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी २२ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यामध्ये जगन्नाथ राघू पडळकर (वय- ५५) आणि सुवर्णा जगन्नाथ पडळकर (वय-५०) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. याबाबत संजय राघु पडळकर (वय-50 वर्षे व्यवसाय मेंढपाळ रा. सुखेड, ता. खंडाळा, जि. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय पडळकर यांची पत्नी तसेच मोठा भाऊ जगन्नाथ पडळकर व वहिनी सुवर्णा पडळकर हे त्यांचे मेंढ्या घेवुन मागील 15 दिवसापुर्वी वालचंदनगर (ता. इंदापुर) येथुन गोखळी (ता. इंदापुर) गावचे हद्दीतील सोनाई डेअरीचे समोर असलेल्या फारेस्टमध्ये राहण्यासाठी आले होते.
मंगळवारी मोठा भाऊ जगन्नाथ पडळकर याने त्यांच्या मेढ्या चारा पाण्यासाठी घेवुन तसेच सोबत वहिनी सुवर्णा या देखील बादलीमध्ये कपडे घेवुन मुक्काम तळापासुन अंदाजे 500 फुट अंतरावर असलेल्या फरिस्टच्या विहीरीवर धुणे धुण्यासाठी गेल्या. काही वेळानंतर अचानक मेंढ्या परत माघारी तळावर आल्या मात्र मेंढ्याच्या पाठीमागे जगन्नाथ आलेला दिसला नाही.
म्हणुन फिर्यादी यांनी त्यांचा शोध घेतला असता फॉरेस्टच्या विहीरीजवळ त्यांचे व वहिनींनी धुण्यासाठी आणलेले साहित्य आढळून आले. यावेळी फिर्यादीने जवळ असलेल्या लोकांना बोलावुन घेत पाण्यात शोध घेतला असता बंधू जगन्नाथ व वहिनी सुवर्णा यांचा मृतदेह आढळून आला. यावरून विहीरीच्या पाण्यात पाय घसरुन पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे तसेच फिर्यादीने याप्रकरणी कोणाविरुद्धही तक्रार नसल्याचे नमूद केले आहे. या घटनेचा पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत.