लोणी काळभोर, (पुणे) : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून दौंड तालुक्यातील कासुर्डी येथील एका तरुणाची 8 लाख 89 हजार रुपयांची फसवणूक केल्याची उघडकीस आली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात पती -पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमोल राजाराम गायकवाड (वय-32 रा. कासुर्डी ता. दौंड) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर तरुण उपाध्याय (वय-41), मोनिका तरुण उपाध्याय (वय-40, रा. आनंद विहार सोसायटी, कवडीपाट टोलनाका, कदमवाक वस्ती, ता. हवेली) असे फसवणूक केलेल्या पती-पत्नीचे नाव आहे. ही घटना डिसेंबर 2022 ते ऑगस्ट 2023 या कालावधीत कदमवाकवस्ती येथील एका मोबाईल शॉपीत घडली आहे. याबाबत अमोल गायकवाड यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या पती-पत्नीने फिर्यादी यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यावर चांगला परतावा मिळतो, असे सांगितले. तसेच शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला. आरोपींवर विश्वास ठेवून फिर्यादी यांनी 8 लाख 89 हजार रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, त्यानंतर आरोपींनी कोणत्याही प्रकारचा परतावा अथवा गुंतवलेली रक्कम परत न करता फसवणूक केली.