ओमकार भोरडे/ तळेगाव ढमढेरे : तांब्याच्या तारा चोरी करणारी टोळी वाघोली पोलिसांनी जेरबंद केली आहे. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून वाहनासह १३ लाख रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. अब्दुल रहमान (रा. सातव नगर, हडपसर), अनिल गुप्ता (रा. विश्रांतवाडी), शिवम कश्यप, विशाल कश्यप (दोघे रा. विश्रांतवाडी, मूळ रा. रायबरेली, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या चोरांची नावे आहेत. याबाबत वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅग्रीको एनर्जी रेटल इंडिया प्रा. लि. या कंपनीतून १७ लाख रुपये किमतीच्या तांब्याच्या तारा २४ ऑक्टोबर २०२४ रोजी चोरीस गेल्या होत्या. याबाबत वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला होता. दरम्यान, त्या तारा ज्या वाहनातून नेल्या त्या वाहनाचा शोध लागल्याने पोलिसांनी त्याच्या चालकाला ताब्यात घेतले.
त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने अन्य तिघांची नावे सांगितली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी दोन ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. ही कामगिरी वाघोलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड, तपास पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक शिरीष भालेराव, कर्मचारी प्रशांत कर्णवर, दीपक कोकरे, प्रितम वाघ, विशाल गायकवाड यांनी केली आहे.