खडकवासला(पुणे) : खडकवासला येथील ‘एनडीए’त तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या छात्रांचा दीक्षांत संचलन सोहळा उत्साहात पार पडला आहे. यावेळी संचलन सोहळ्यात हवाई दलाच्या विमानांनी दिलेली विशेष सलामी मुख्य आकर्षणाचा भाग ठरली. यावेळी भारतीय हवाईदलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग हे प्रमुख पाहुणे होते. त्यांनी संचलनाची पाहणी करून मानवंदना स्वीकारली आणि छात्रांना मार्गदर्शन केले. संचलनामध्ये ३५७ छात्र सहभागी झाले होते.
संचलनामध्ये ३५७ छात्र सहभागी..
यावेळी संचलनामध्ये ३५७ छात्र सहभागी झाले होते. यामध्ये २१५ लष्कर, ३८ नाविक दल आणि १०४ हवाई दलाच्या छात्रांचा समावेश होता. यासह भूतान, ताजिकिस्तान, श्रीलंका, म्यानमार, बांगलादेश, मलेशिया, सुदान, टांझानिया, केनिया, झांबिया आणि मालदीव या मित्र देशांतील १९ छात्रांचाही या संचलनात समावेश होता. सध्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या प्रशिक्षण कालावधीत असलेल्या ४७ महिला छात्रांच्या तुकडीनेही संचलनात सहभाग घेतला होता.
यावेळी एअर व्हाइस मार्शल सरताज बेदी, ‘एनडीए’चे कमांडंट व्हाइस अॅडमिरल गुरुचरणसिंग, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ आदी उपस्थित होते. अंकित चौधरी याला राष्ट्रपती सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले तर युवराजसिंग चौहान याला रौप्यपदक आणि जोधा थोंगजाउमायुम याला ब्राँझपदक देऊन गौरविण्यात आले. तर ‘गोल्फ’ स्क्वार्डनला ‘द चीफ ऑफ स्टाफ बॅनर’ प्रदान करण्यात आला.
भारतीय हवाई दलाची मदार असलेल्या ‘सुखोई ३०’ या वेगाने हवेत झेपावणाऱ्या लढाऊ विमानांनी ‘एनडीए’च्या सुदान ब्लॉकवरून भरारी घेत संचलनाला मानवंदना दिली. त्या आधी आलेल्या चेतक हेलिकॉप्टर आणि ‘पी८आय पोसायडन’ या लढाऊ विमानानेही उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
तरुण अधिकारी या नात्याने भविष्यातील कोणत्याही संघर्षात तुमची भूमिका महत्त्वाची असणार आहे. शत्रूची रचना लक्षात घेऊन त्यांना पराभूत करणे आणि आपल्या महान राष्ट्राच्या अखंडतेशी तडजोड केली जाणार नाही, याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे. कोणताही निर्णय घेताना आत्मविश्वासाने आणि निर्भीडपणे घ्या. ‘एनडीए’मध्ये शिकलेली प्रार्थना लक्षात ठेवा, ती तुम्हाला एक दिशादर्शकाचे काम नक्की करेल.
– अमरप्रीत सिंग, हवाईदल प्रमुख