लोणी काळभोर (पुणे) : कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एमआयटी चौकात किरकोळ कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी (ता. १४) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अध्यात्म ललित रावत (वय २०, धंदा शिक्षण, सध्या रा. म्यानेट होस्टेल, एम.आय.टी. कॉलेज, लोणी काळभोर, ता. हवेली), आनंदशंकर प्रकाशकुमार शर्मा, (वय २०, सध्या रा. एस. ओ. ई. होस्टेल, एम.आय.टी. कॉलेज, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. मूळ रा. मुजरा, बासंद्रोणी, कोलकता), हृतिक बोबडे (रा. लोणी काळभोर, ता. हवेली) व इतर ४ ते ५ अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आध्यात्म रावत व आनंदशंकर शर्मा हे लोणी काळभोर येथील एमआयटी या शैक्षणिक संस्थेत इंजिनिअरिंग शिकत आहेत. बुधवारी (ता. १३) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास दोघेही कॉलेजकडे चालत जात असताना अध्यात्म रावत याचा हृतिक बोबडे याला धक्का लागला होता. या कारणावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली होती.
या वेळी हृतिक बोबडे याने फोनवरून संपर्क साधत त्याच्या आणखी साथीदारांना बोलावून घेतले. या वेळी दुचाकीवर आलेल्या दोघांनी अध्यात्म व रावत यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी दुचाकीवर आलेल्यापैकी एका तरुणाने जमिनीवर पडलेला दगड उचलून अध्यात्म याच्या डोक्यात मारला. या घटनेने परिसरात बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.
संबंधित घटनेची लोणी काळभोर पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थली दाखल झाले. पोलीस आल्याची चाहूल लागताच यातील काहीजण फरार झाले. त्याठिकाणी असलेल्या तिघांना लोणी काळभोर पोलिसांनी ताब्यात घेतले असून, आणखी ४ ते ५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे करीत आहेत.
एमआयटीच्या मुलांची कायम वर्दळ…
एमआयटी संकुलात व परिसरात मुलांची व मुलींची मोठमोठी होस्टेल आहेत. या परिसरात रात्री ९ ते ११ वाजण्याच्या सुमारास होस्टेल, कॉलेजच्या मुली, मुले तसेच परिसरातील टवाळ मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. याठिकाणी असलेल्या काही दुकानांत, हॉटेल तसेच टपऱ्यांच्या बाजूला सिगारेट ओढण्यासाठी मोठी गर्दी दिसून येते. यावेळी या चौकात वारंवार छोटी-मोठी भांडणे ही नित्याची बाब झाली आहे. मात्र, पोलिसांकडून आजतागायत कोणावरही मोठी कारवाई केलेली नाही.