पुणे : पुणे विद्यापीठ चौकाजवळ राजभवन येथे एक कंटनेर पलटी झाला आहे. पहाटेच्या चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून बाणेर, औंध रोडवर शनिवारी सकाळी वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान, सांगवीकडून विद्यापीठाकडं येणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच ब्रेमेन चौकातून येणारी वाहतूक बोपोडीच्या दिशेने वळवण्यात आली आहे.
कंटेनर उलटल्यामुळं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. याभागात सकाळी ऑफिससाठी बाहेर पडलेले नागरिक आणि शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांचा मोठा खोळंबा झाला.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पुण्यातील गणेश खिंड रस्त्यावरील विद्यापीठासमोरील आनंदऋषीजी महाराज चौक परिसरात मेट्रोचे काम सुरू आहे. या कामांसाठी आलेला मालवाहू ट्रेलर राजभवनजवळ चतु:शृंगी पोलिस ठाण्यासमोर युटर्न घेताना पलटी झाला. पहाटेच्या ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
या अपघातामुळे ब्रेमेन चौकातून विद्यापीठासमोरून पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक बोपोडीमार्गे वळविण्यात आली आहे. या घटनेमुळे दररोज सकाळी विद्यापीठ चौकासमोर होणाऱ्या वाहतूक कोंडीत आणखी भर पडली असून वाहन चालकांचा मोठं खोळंबा झाला आहे.