पुणे: पुरंदर तालुका व बारामती तालुक्यातील 36 गावांचा समावेश असलेल्या, निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची आज मंगळवारी निवड करण्यात आली. सासवड येथील उप बाजारातील कार्यालयामध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये काँग्रेसचे संदीप फडतरे यांची सभापती पदासाठी तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बारामती तालुक्यातील करंजे येथील रहिवासी असलेले बाळासो शिंदे यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
आज सकाळी सभापती व उपसभापती पदासाठी काँग्रेसचे संदीप फडतरे व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बाळासो शिंदे या दोघांचेच उमेदवारी अर्ज प्राप्त झाले. त्यामुळे या दोघांची अनुक्रमे सभापती व उपसभापती म्हणून निवड करण्यात आली. निरा कृषी उत्पन्न बाजार समितीवर यापूर्वी देखील अजित पवार यांचेच वर्चस्व राहिलेले आहे.
यापूर्वीचे सभापती पद शरद जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे होते. ठरल्याप्रमाणे त्यांचा कार्यकाळ संपताच राजीनामा दिल्याने व उपसभापती महादेव (नाना) टिळेकर हे काँग्रेस पक्षाचे यांचा कार्यकाल संपल्याने राजीनामा दिला होता. दोन्ही पदे रिक्त झाले होते. या रिक्त पदासाठी आज निवडणूक घेण्यात आली.
नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवड ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार, शरद पवार एकत्र असताना झाली होती. यावेळी राष्ट्रवादीचे 10 उमेदवार निवडून आले होते. तर काँग्रेसचे 8 उमेदवार निवडून आले होते. काँग्रेस व राष्ट्रवादीकडून कार्यकाल वाटून घेण्यात आला होता. अजित पवारांच्या नेतृत्वाखालील संचालक शरद जगताप यांना पहिल्यांदा सभापती पद करण्यात आले होते. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार यांच्याकडे 6 बाजार समितीचे संचालक तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे 4 संचालक असल्याचे बोलले जात होते. तर माजी आमदार संजय जगताप यांच्याकडे 8 संचालक आहेत.
विधानसभा निवडणुकीनंतरच्या राजकीय समीकरणांनुसार महाविकास आघाडीकडे एकूण 12 संचालक आहेत. त्यामुळे या बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे पारडे जड असल्याचे बोलले जात होते. परंतु मागील दोन दिवसात नाट्यमय घडामोडी नंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाने उपसभापती पदावर दावा कायम ठेवत, बाजी मारली असल्याचे दिसून आले. तर शरद पवार गटाला उपसभापती पदाला मुकावे लागले असल्याची पुरंदर व बारामती मधील नागरिकांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे.