लोणी काळभोर, (पुणे) : मुलांचे शाळेतील रोजचे नवनवीन अनुभव जाणून घेऊन चुकीसाठी शिक्षा आणि चांगुलपणासाठी शाबासकी दिली पाहिजे. मुलांचे मित्र बनून त्यांच्या आवडी निवडी, छंद यांची माहिती जाणून घेऊन त्यांना प्रोत्साहन द्यावे असे प्रतिपादन ज्ञानप्रोधिनी संवादिनी विकास गटाच्या समुपदेशिका डॉ. सौ. अंजली राईलकर यांनी केले.
लोणी काळभोर (ता. हवेली) येथील रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता 7 वी व 8 वीतील विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी ‘जागृत पालकत्व’ या समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित पालकांना मार्गदर्शन करताना अंजली राईलकर बोलत होत्या.
या कार्यशाळेची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन ने करण्यात आली. यावेळी स्कुलचे अध्यक्ष नितीन काळभोर, संचालिका मंदाकिनी काळभोर, प्राचार्या मिनल बंडगर, उपप्राचार्य प्रशांत लाव्हरे, भारतमाता अभियानाच्या परिमला पांडे व मोठ्या संख्येने पालकवर्ग उपस्थित होता.
यापुढे बोलताना राईलकर म्हणाल्या, “आपल्या मुलांकडून स्वतंत्रपणे समाजात वागताना होणाऱ्या क्रिया, प्रतिक्रिया अपुरा अनुभव आणि जुजबी ज्ञान यामुळे अपरिपक्व असण्याची शक्यता अधिक असते. मात्र यावरून आपण मुलांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे न करता त्याला योग्य मार्गदर्शन व समुपदेशन करून चांगले किंवा वाईट यातील फरक लक्षात आणून देऊन त्याच्यातील गुणात्मक सुधारणेसाठी पोषक वातावरण तयार करणे गरजेचे असते.”
दरम्यान, रेनबो इंटरनॅशनल स्कुल पुढाकार घेऊन पालकांमध्ये पालकत्वाविषयी जाणीव जागृती निर्माण होण्यासाठी नियमितपणे करत असलेल्या विशेष प्रयत्नांचे पालकांनी भरभरून कौतुक केले.. कार्यशाळेसाठी उपस्थित राहिलेल्या प्रमुख पाहुण्यांचे व पालकांचे स्वागत तसेच आभार स्कुलच्या शिक्षिका निलोफर तांबोळी यांनी मानले.