पुणे : सायबर गुन्हेगारीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. ऑनलाईन टास्क पूर्ण केल्यास भरपूर पैसे मिळतील, असे आमिष दाखवून एकाची तब्बल १५ लाख ८२ हजार ९७५ रुपयांची ऑनलाईन पद्धतीने आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात सायबर चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अमरनाथ नकुलचंद्र रॉय (वय ५१, रा. आनंद पार्क, वैभवनगर) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन ९३०२२६३१०४ क्रमांकाचा मोबाईल धारक, टेलिग्राम धारक व पंजाब बँकेतील खातेधारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी मोबाईलधारकाने फिर्यादीच्या व्हॉट्सअॅपवर संपर्क साधला. मेसेज करुन ऑनलाईन टास्क पूर्ण केल्यानंतर भरपूर पैसे मिळतील, असे आमिष दाखवले. त्यानंतर टेलिग्रामवर लिंक पाठवून फिर्यादी यांना खाते उघडण्यास सांगितले. टेलिग्राम ग्रुप चालवणाऱ्या सायबर चोरट्याने सुरुवातीला फिर्यादी यांनी भरलेल्या व पूर्ण केलेल्या टास्कची रक्कम तक्रारदारांना देऊन विश्वास संपादन केला. यानंतर सायबर चोरट्यांनी वेगवगेळी कारणे सांगून फिर्यादी यांना बँक खात्यात १५ लाख ८२ हजार ९७५ रुपये भरण्यास सांगितले. यानंतर त्यांना कोणताही टास्क अथवा दिलेली रक्कम परत केली नाही.
दरम्यान, काही काळानंतर आपली घोर फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. त्यानंतर रॉय यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) भालचंद्र ढवळे करीत आहेत.