पुणे : कर्नल वैभव अनिल काळे (निवृत्त) यांच्या पार्थिवावर पुणे कॅन्टोन्मेंट मुक्तीधाम स्मशानभूमी (धोबीघाट) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस दलाच्या जवानांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून शहीद जवानास मानवंदना दिली. शहीद कर्नल वैभव काळे यांचा मुलगा वेदांत आणि मुलगी राधिका यांनी पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.
यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी शहीद कर्नल वैभव काळे यांना पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. भारतीय सैन्याच्यावतीने दक्षिण कमांडचे चीफ ऑफ स्टाफ मेजर जनरल आर. एस. सुंदरम यांनी पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. यावेळी वैभव काळे यांची आई रचना काळे, पत्नी अमृता काळे, भाऊ विंग कमांडर अक्षय काळे आणि सासरे कर्नल विवेक खैरे (नि.) उपस्थित होते.
7 ऑक्टोबरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर इस्रायल-हमास संघर्षाच्या सुरुवातीपासून गाझामधील आंतरराष्ट्रीय UN कर्मचाऱ्याचा रफाहमध्ये मृत्यू झाल्याची ही पहिली घटना आहे. कर्नल वैभव काळे हे नागपुरातील परांजपे हायस्कुल आणि भवन्स विद्या मंदिरचे माजी विद्यार्थी होते. जागतिक संघटनेने त्यांच्या अधिकृत एक्स मीडिया म्हणजेच आधीचं ट्विटर, या अकाऊंटवरुन वैभव काळे यांच्या मृत्यू बाबत माहिती दिली आहे.