उरुळी कांचन (पुणे) : अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणे गुरुवारी (ता. २८) उत्साहात पार पडली. लाखो मावळे महाराजांसमोर नतमस्तक झाले. सर्व जाती-धर्माच्या मावळ्यांनी महाराजांच्या पराक्रमाचे गोडवे गायले. उरुळी कांचन येथील असाच एक मुस्लिम मावळा खलिल महेमुद शेख मागील ११ वर्षांपासून हिंदू-मुस्लिम बंधुभाव जोपासत शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी करीत आहे.
छत्रपतींच्या पुतळ्याला अभिवादन करत मुस्लिम समाजाने सर्वधर्म समभावाची प्रचिती दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास विविध संघटना, पदाधिकारी व नागरिकांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी परिसरातील विविध भागांतील, विविध पक्षांचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित असलेल्या सर्वांसाठी लिंबू सरबत देण्यात आले.
या वेळी उरुळी कांचन येथील महावीर निवासी मुक-बधिर विद्यालयातील मुलांना अल्पोपहार आणि ओळखपत्र होल्डर्सचे वाटप केले. उरुळी कांचन येथील मुस्लिम समाजातर्फे शोयेबभाई मणियार आणि मित्र-मंडळींकडून या विद्यालयास अन्न-धान्याचा कोरडा शिधा देण्यात आला. खलील शेख हे विविध उपक्रम राबवून कधी रोपे वाटणे, गरजवंतांना गृहोपयोगी वस्तूंचे वाटप करणे आदी उपक्रमांचे आयोजन करतात.
दरम्यान, या सोहळ्यास सासवड येथील इतिहास अभ्यासक महेंद्र नवले, येसाजी कंकांचे वंशज विकास कंक, रविंद्र कंक, सरदार शिळिमकरांचे वंशज मंगेश शिळिमकर, मुकुंद पायगुडे, योगेश खोपडे, शोयेबभाई मणियार, काळूराम मेमाणे यांच्यासह गावातील सर्व आजी-माजी पदाधिकारी, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याबाबत बोलताना खलील शेख म्हणाले, “शिवरायांनी स्थापन केलेले रयतेचे राज्य हे देशातील पहिले धर्मनिरपेक्ष राज्य आहे. महाराजांनी सर्वच धर्मग्रंथ व प्रार्थनास्थळांना सारखेच महत्त्व दिले. ते खऱ्या अर्थाने सहिष्णू राजे होते. सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी अशा पद्धतीने नेहमीच उपक्रम राबविले गेले तसेच या पुढेही राबवले जातील.”