पुणे : पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना निवडणूक आयोगाने ‘बेस्ट इलेक्टोरल प्रॅक्टिसेस अवॉर्ड’ जाहीर केला आहे. हा पुरस्कार बुधवारी (ता.२५ जानेवारी) देण्यात येणार आहे.
डॉ. राजेश देशमुख यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेत उत्कृष्ट कल्पनांचा वापर केला असून त्यांनी जिल्ह्यामध्ये मतदार शिक्षण आणि मतदार शिक्षणासाठी अनेक नावीन्यपूर्ण कल्पना राबवल्या. युवकांचा मतदार नोंदणीतील सहभाग वाढविणे, महिलांची मतदार नोंदणी याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले आहे.
वंचित घटकांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचे उद्दिष्ट ठेवले. तसेच यामध्ये तृतीयपंथी मतदार, दिव्यांग मतदार, देह विक्री व्यवसायातील महिला यांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली.
मतदार नोंदणीसाठी महाविद्यालयांमध्ये आयोजित शिबिरांनाही युवकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यासह संयुक्त विद्यमाने शाळा व महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता संघांच्या बळकटीकरणाचा कार्यक्रम घेतला आहे.
दरम्यान, डॉ. राजेश देशमुख यांनी निवडणूक प्रक्रियेत केलेल्या कार्याची दाखल घेऊन केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांना ‘बेस्ट इलेक्टोरल प्रॅक्टिसेस अवॉर्ड’ जाहीर केला आहे. आणि हा पुरस्कार निवडणूक आयोगाच्या वतीने बुधवारी (ता.२५) देण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या वतीने देण्यात आली.