लोणी काळभोर, (पुणे) : हवेली तहसील कार्यालयाचे पुढील दोन – तीन महिन्यात विभाजन करण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. विखे पाटील पुण्यात आले असता माध्यमांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही माहिती दिली.
यापुढे बोलताना पाटील म्हणाले, राज्यातील मोठ्या तहसील कार्यालायांचे विभाजन करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. जिल्ह्यातील हवेली तहसील कार्यालयाचेही विभाजन केले जाईल.
मोठ्या तहसील कार्यालयांचे कामकाज करताना एकाच अधिकाऱ्याकडे सर्व अधिकार असतात. त्यामुळे या कार्यालयांचे विकेंद्रीकरण करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे तेथील भ्रष्टाचार कमी होईल.
हवेलीच्या तत्कालीन तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांचे नुकतेच निलंबन करण्यात आले. याबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांचे निलंबन नियमाला धरूनच शासनाकडून करण्यात आले आहे. कोलते यांनी पुण्यातील एका गृहनिर्माण सोसायटीमध्ये पाच हजार मतदारांची नोंदणी केली होती. एकाच सोसायटीमध्ये पाच हजारमतदार कसे असू शकतील, असा सवाल विखे पाटील यांनी केला.
दरम्यान, कोलते पाटील यांच्या एकूणच कामकाजाबद्दल गंभीर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार पुण्याच्या जिल्हाधिकारी यांनी तक्रारींची दखल घेऊन विस्तृत अहवाल पाठविला होता. त्या अहवालाच्या आधारेच कोलते यांचे निलंबन करण्यात आले असेही विखे पाटील यांनी स्पष्ट केले.