यवत: दौंड तालुक्यातील कानगाव ग्रामपंचायतने २६ जानेवारी रोजी आयोजित केलेल्या ग्रामसभेत ऐनवेळी आलेल्या अर्जास विरोध केल्याने दोघांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. यानंतर गावातच एकच खळबळ उडाली. या प्रकरणी राजेंद्र दशरथ गवळी यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, फिर्यादीसह एकजण या हल्ल्यात जखमी झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कानगाव ग्रामपंचायतने २६ जानेवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता गावातील विठ्ठल मंदिरात आयोजित करण्यात आली होती. त्याप्रमाणे ग्रामसभा सुरु झाल्यानंतर ज्ञानेश्वर उर्फ माउली आपासो शेळके यांनी ग्रामसेवक मोहन मिसाळ यांना अर्ज घ्या, असे सांगितले. त्याचवेळी राजेंद्र दशरथ गवळी यांनी अर्ज देण्यासाठी सात दिवसांची मुदत होती. ही मुदत संपून गेल्याने अर्ज स्वीकारण्यात येऊ नये, असे ग्रामसेवकांना सांगितले. या गोष्टीचा राग आल्याने ज्ञानेश्वर शेळके याने त्याचे मेहुणे वैभव संजय निगडे, अक्षय संजय निगडे व ओंकार राजेंद्र निगडे यांना तलवारी आणण्यास सांगून आज याला जिवंत सोडायचे नाही, असे म्हटले. त्यानंतर वैभव आणि अक्षय निगडे या दोघांनी तलवार, तर ओंकार निगडे हा कोयता घेऊन आला. राजेंद्र गवळीला आता खल्लास करतो, असे म्हणत अक्षय निगडे याने गवळी यांच्या मानेवर तलवारीने वार केला.
परंतु, वैभव शांताराम गवळी याने तलवारीचा तो वार हातावर घेतल्याने त्याच्या पंजाला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तलवार पकडली या कारणाने वैभव निगडे याने वैभव गवळी याच्या पाठीत वार केले, तर अक्षय निगडे हा डोक्यात वार करण्यासाठी आला. त्यावेळी भाऊसाहेब रंगनाथ कोहाळे यांनी तलवार धरली असता तुलाही तलवारीने मारीन असे म्हटले, तेव्हा ते बाजूला झाले.
यावेळी ज्ञानेश्वर शेळके याने कोणालाच जीवंत सोडायचे नाही, असे म्हणत राजेंद्र गवळी यांच्या पाठीत दगड मारला तर आप्पासाहेब सदाशिव काळे, दिगंबर आप्पासो काळे यांनी छातीत लाथा मारल्या. ‘आमचा नाद पुन्हा केला, तर तुमचे सर्व खानदान संपवून टाकू’. तसेच कोयता व तलवार फिरवत ‘बाॅस फक्त आम्हीच’ असे म्हणत दहशत निर्माण केली आणि निघून गेले असल्याची फिर्याद राजेंद्र दशरथ गवळी यांनी यवत पोलीस स्टेशन येथे दिली. त्यानुसार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आपासो शेळके, अक्षय संजय निगडे, वैभव संजय निगडे, ओंकार राजेंद्र निगडे, आप्पासाहेब सदाशीव काळे, दिगंबर आप्पासो काळे (सर्व रा. कानगाव ता.दौंड जि.पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख हे करीत आहेत.