-बापू मुळीक
सासवड : मांढर (ता.पुरंदर) येथे “कमिटेड कम्युनिटीज डेव्हलपमेंट ट्रस्ट (CCDT)” संस्था व मांढर ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने ‘बाल विवाह मुक्त भारत ‘अभियानाला सुरवात करण्यात आली. गावकऱ्यांनी मशाल फेरी काढून बाल विवाह या विषयावर जागृती केली असल्याचे सरपंच वनिता पापळ यांनी सांगितले. यावेळी प्रकल्प अधिकारी धनराज खरे, उपसरपंच किरण काशीद उपस्थित होते. मशाल फेरीत ग्रामस्थ, महिला व किशोरवयीन मुलींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
ग्रामपंचायत कार्यालयासमोर मशाली व मेणबत्ती पेटवून मशाल फेरीला सुरवात करण्यात आली. यामध्ये अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती तसेच ग्रामस्थांनी सहभाग घेतला. बाल विवाह रोखण्यासाठी घोषणा देत गावातील भैरवनाथ चौकात धनराज खरे यांनी बाल विवाह रोखण्याची प्रतिज्ञा देऊन फेरीची सांगता करण्यात आली.
दक्षिण पुरंदरमध्ये परिंचे, हरणी, माहूर, मांढर, राऊतवाडी या गावांमध्ये प्रभातफेरी, मशाल फेरी, ग्रामसभा, शाळेतील विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा आदी कार्यक्रमांचे आयोजन ग्रामपंचायत व शाळांच्या मदतीने करण्यात आले. या कार्यक्रमाचा भाग म्हणून संस्थेने पुरंदर तालुक्यातील 25 गावांमध्ये 15 ग्रामपंचायत व परिसरातील शाळांना बरोबर घेऊन ‘ बाल विवाह मुक्त भारत ‘ हे अभियान राबविण्यात येणार आहे.
गावपातळीवर शासनाशी निगडित असलेल्या सर्व घटकांना एकत्र करून हे अभियान राबविण्यात येणाऱ्या आहे. बाल विवाह रोखण्यासाठी गावातील समस्त नागरिक, ग्राम सेवक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, पोलीस, पोलीस पाटील, कोतवाल एकत्र येत संधरबीत व्यक्तीचे समुपदेशन करीत बालविवाह रोखतील. तसेच असे न केल्यास शासनास तक्रार करीत बाल विवाह रोखण्यात येईल, असे प्रकल्प अधिकारी धनराज खरे यांनी सांगितले आहे.
कमिटेड कम्युनिटीज डेव्हलपमेंट ट्रस्ट (CCDT) ही जस्ट राइट्स फॉर चिल्ड्रन या देशभरातील मुलांच्या हक्कांच्या रक्षणासाठी काम करणाऱ्या दोनशेहून अधिक एनजीओ च्या राष्ट्रीय युतीचा एक भाग आहे. भारतातील बालकांच्या हक्कांसाठी ऍक्सेस टू जस्टीस हा प्रकल्प देश पातळीवर राबविला जात आहे. बालविवाह मुक्त भारत या विषयाला अनुसरून प्रकल्पात बालकांच्या हक्कांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून या अंतर्गत पुणे जिल्ह्या मध्ये जनजागृती कार्यक्रम राबविले जात असल्याचे प्रकल्प प्रमुख दिलीप त्रिपाठी यांनी सांगितले आहे.