उरुळी कांचन : पूर्व हवेलीतील उरुळी कांचनसह परिसरात डेंगी व चिकनगुनिया सदृश्य लक्षणांचे रुग्ण आढळल्याने मागील चार दिवसांपासून उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायतीतर्फे औषध व धूर फवारणी मोहिमेला गती देण्यात आली आहे. नागरिकांनी या साथीच्या आजाराबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन ग्रामपंचायतीचे सरपंच अमित बाबा कांचन व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी मेहबूब लुकडे यांनी केले आहे.
उरुळी कांचन ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने साथीचे रोग आटोक्यात आणण्यासाठी धूर फवारणी करणे, बांधकाम सुरु असेल त्या ठिकाणी पाणी साठत असलेल्या ठिकाणी ऑईल टाकणे, वाडी वस्त्यांवरील नागरिकांना माहिती देणे. परिसराची पाहणी करून व्हायरल इन्फेक्शन व डेंगी व चिकनगुनियासदृश लक्षणांची माहिती देऊन जनजागृती करण्यात येत आहे.
गेल्या पंधरवड्यापासून शहरातील ठराविक भागात डेंगी व चिकनगुनियासदृश आजाराचे रुग्ण आढळत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात व खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी अशा रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यानंतर याची दखल घेत मागील चार दिवसांपासून उरुळी कांचन व परिसरात डास प्रतिबंधक फवारणीची मोहीम गतीने सुरू केली आहे. गल्लीबोळासह अडगळीच्या जागा, गटारी, तुंबलेले पाणी आदी ठिकाणी ही फवारणी केली जात आहे.
पाणीसाठवणीचे साहित्य आठवड्यातून एकदा स्वच्छ करावे, त्यावर नियमित झाकण ठेवावे, गळके नळ वेळीच दुरुस्त करणे, घराभोवती कचरा साठवू नये, पावसाचे व सांडपाणी साचणार नाही, याची दक्षता घेणे, डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी डबकी, रिकामे टायर्स, डबे, बॅरेल, नारळ करवंटी, वॉटर कुलर, फ्रीज आदी साहित्याची आठवड्यातून एकदा स्वच्छता करावी, आठवड्यातील एक दिवस कोरडा दिन पाळावा, असे आवाहन आरोग्य केंद्रामार्फत करण्यात आले आहे.
दरम्यान, घराभोवती अथवा परिसरात पाणी साचू न देणे, साचलेली डबकी वाहती करणे किवा बुजवणे, घराच्या खिडक्यांना डासविरोधी जाळ्या बसविणे, छतावरील पाण्याच्या टाक्यांना घट्ट झाकण लावणे, पाण्याची भांडी झाकून ठेवणे, घरगुती पाण्याचे साठे आठवड्यातून किमान एकदा रिकामे करून घासून, पुसून, स्वच्छ करून कोरडा दिवस पाळणे, टायर, फुटके कॅन, डबे यांची योग्य रीतीने विल्हेवाट लावून त्यात पाणी साठणार नाही याची काळजी घेणे. झोपताना मच्छर दाणीचा वापर करणे, पूर्ण बाह्यांचे कपडे घालणे, संडासच्या व्हेंट पाइपला जाळी बसविणे, कायमस्वरूपी डासोत्पत्ती स्थानामध्ये गप्पी मासे सोडणे. घरातील पाण्याची भांडी नियमित धुणे, कुठेही पाणी साचू न देणे ही काळजी प्रामुख्याने घेण्याची गरज आहे.
याबाबत उरुळी कांचनचे सरपंच अमित (बाबा) कांचन म्हणाले, “डेंगी होऊ नये म्हणून अगोदरच सार्वजनिक ठिकाणी तसेच उरुळी कांचन परिसरात मागील चार दिवसांपासून मशिनच्या सहाय्याने धुरळणी सुरू केली आहे. सर्व ठिकाणी पावडर मारणे, सर्व कचरा साफ केला असून ग्रामपंचायत कर्मचारी व आशा वर्कर यांच्या सहाय्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना करून डासांचे प्रमाण 99 टक्के कमी करण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत सुरु आहे.”
याबाबत उरुळी कांचनचे माजी सरपंच संतोष कांचन म्हणले, “प्रतिबंधात्मक उपाययोजना गावात सर्वच ठिकाणी सुरु केल्या आहेत. पाणी साचत असेल त्या ठिकाणी पाण्याचा निचरा करावा त्यामुळे डेंगीचे डास बसणार नाहीत. तसेच गावामध्ये प्रत्येक वार्डानिहाय कचरा गाड्या असून नागरिकांनी कचरा हा कचरा गाडीतच टाकावा. उरुळी कांचन व परिसरात डेंगू संदर्भात जनजागृती सुरु असून पाण्याची डबकी, फ्रीजच्या पाठीमागे साचलेले पाणी वारंवार काढणे व आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा.”
याबाबत बोलताना उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी मेहबूब लुकडे म्हणाले, “प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत उरुळी कांचन व परिसरात डेंगू संदर्भात जनजागृती सुरु आहे. पाण्याची डबकी, फ्रीजच्या पाठीमागे साचलेले पाणी वारंवार काढणे व आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. थंडी भरून ताप येणे, तीव्र डोकेदुखी, मळमळणे, उलटी होणे, सांधेदुखी, डोळे दुखणे, पुरळ उठणे, अंगावर लाल चट्टे उठणे आदी लक्षणांच्या रुग्णांनी तातडीने आरोग्य केंद्राशी संपर्क साधून उपचार घ्यावेत.