लोणी काळभोर (पुणे) : स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे, यासाठी ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियान राबविण्याचे आदेश पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी दिले आहेत. या अभियानातून शाळेची गुणवत्ता वाढवून लाखोंची बक्षिसे पटकावण्याची संधी शाळांना मिळणार आहे. मात्र, ४५ दिवसांतच अभियान उरकण्याचे आव्हान शाळांसमोर ठाकले आहे.
पुणे जिल्ह्यासह पूर्व हवेलीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व खासगी शाळांमध्ये १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान हे अभियान राबविले जाणार आहे. शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी आणि त्यातून स्पर्धात्मक वातावरण तयार होऊन विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे, यासाठी राज्यात ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान राबविले जात आहे. कार्यक्रमाच्यावेळी पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या ‘माझी शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमाअंतर्गत संदेश पत्रकाचे वाटप करण्यात आले.
दरम्यान, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्याबरोबरच अध्ययन, अध्यापन व प्रशासनात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देणे, शिक्षणासाठी पर्यावरणपूरक व आनंददायी वातावरणाची निर्मिती करणे, शाळेचे शिक्षक, माजी विद्यार्थी व पालक यांच्यात शाळेविषयी कृतज्ञतेची व उत्तरदायित्वाची भावना निर्माण करणे हे अभियानाचे उद्दिष्ट आहे. लोणी काळभोर केंद्रांतर्गत येणाऱ्या शाळेत केंद्रप्रमुख राजेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
राज्यस्तरावरील विजेत्या शाळेला ५१ लाख मिळणार
या अभियानात तालुका स्तरावर अव्वल ठरणाऱ्या शाळेसाठी पहिले बक्षीस तीन लाख रुपयांचे, दुसरे दोन लाख रुपयांचे तर तिसरे बक्षीस एक लाख रुपये दिले जाणार आहे. जिल्हा स्तरावर बक्षिसाची रक्कम अनुक्रमे ११ लाख, पाच लाख आणि तीन लाख रुपये आहे; तर विभाग स्तरावर झेप घेणाऱ्या शाळेला पहिले बक्षीस म्हणून २१ लाख रुपये, दुसरे बक्षीस ११ लाख रुपये आणि तिसरे बक्षीस म्हणून सात लाख रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे. तसेच राज्यातून अव्वल म्हणून निवडल्या जाणाऱ्या शाळेला पहिले बक्षीस चक्क ५१ लाख रुपये, दुसरे बक्षीस २१ लाख रुपये आणि तिसरे बक्षीस म्हणून ११ लाख रुपये मिळणार आहेत.