पुणे : सीओईपी टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू प्राचार्य. मुकुल सुतावणे यांच्याहस्ते या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी व महावितरणच्या पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांचा विद्यापीठाच्या सभागृहात नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर अधीक्षक अभियंता प्रकाश राऊत व सतीश राजदीप यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी तत्कालीन कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, पुणे या शासकीय महाविद्यालयातून १९८८ मध्ये विद्युत अभियांत्रिकी पदवी विशेष प्राविण्यासह प्राप्त केली. त्यानंतर श्री. पवार महावितरणच्या सेवेत दाखल झाले. राजेंद्र पवार यांची नुकतीच मुख्य अभियंतापदी पदोन्नती झाली. त्यानिमित्त सीओईपी टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कुलगुरू प्राचार्य. मुकुल सुतावणे यांच्याहस्ते श्री. पवार यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कुलगुरू प्रा. सुतावणे म्हणाले की, सामाजिक बांधिलकी जपणारे पवार यांचा शैक्षणिक प्रवास हा उत्कृष्ट राहिला आहे. तसेच वीज व सेवा क्षेत्रातील ३३ वर्षांच्या अनुभवामुळे पवार यांच्या नेतृत्त्वात पुणे परिमंडलातील महावितरणच्या विविध सेवा अधिकाधिक ग्राहकाभिमुख होतील व ग्राहकांना उत्कृष्ट सेवा मिळेल.
सोबतच सीओईपी विद्यापीठ व महावितरणच्या संयुक्त सहकार्याने वीज क्षेत्रातील विविध आधुनिक अभ्यासक्रमांना चालना दिली जाईल असे कुलगुरू प्रा. सुतावणे यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष पटनी यांनी केले.