पुणे : अखंड महाराष्ट्राचे प्रेरणास्थान स्वराज्यरक्षक छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या सुमारे २७० कोटी रुपये खर्चून उभारलेल्या ऐतिहासिक राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन २ मार्च रोजी श्री क्षेत्र तुळापूर येथे होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे.
श्री क्षेत्र तुळापूर येथे दुपारी १.३० वाजता भूमिपूजन कार्यक्रम होणार आहे. शिवभक्त आणि शिवप्रेमींसाठी हा ऐतिहासिक असा क्षण आहे. मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्यातील ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी हजारोंच्या संख्येने शिवप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष (उत्तर) शरद बुट्टे पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे.
कसे असेल राष्ट्रीय स्मारक?
छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाशी साधर्म्य सांगणारे हेरिटेज टच असलेले जागतिक दर्जाचे ऐतिहासिक स्मारक तुळापूर येथे उभारण्यात येणार आहे. वढू येथील समाधी स्थळाला जागतिक दर्जाचे प्रेरणास्थळ बनविण्यासाठी त्या परिसरात अनेक विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. वढू बुद्रूक गावाचे मुख्य प्रवेशद्वार ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा सांगेल, असे उभारण्यात येईल.
इतिहासकाळास अनुरूप दगडी बांधकाम, इतिहासाची साक्ष देणाऱ्या समाधी स्थळाच्या भिंती व बुरुज, बहुद्देशीय सभागृह, भक्त निवास, समाधी स्थळाच्या मागील बाजूस ऐतिहासिक चित्रे अशा पद्धतीचा आराखडा करण्यात आला आहे. गावातील अंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण, नाले आणि जलस्रोतांची सुधारणा, पूल आणि बंधाऱ्यांचा विकास, नदीवर घाट बांधणे, बलुतेदार (गावगाडा) ग्रामीण संस्कृती मांडणे आदी कामे आराखड्यामध्ये प्रस्तावित केली आहेत.