पुणे : बिबवेवाडी परिसरातील अप्पर जुना बसस्टॉप समोरील बुद्ध विहार समोर जुन्या वादातून एका तरुणाचा पाठलाग करुन धारदार शस्त्राने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना बुधवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोन सराईत गुन्हेगारांवर बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी सुरज संतोष कोल्हे (वय-२० रा. सिद्धार्थनगर, अप्पर जुना बसस्टॉप जवळ, बिबवेवाडी) याने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून ओंकार थोरात (रा. जांभुळवाडी, कात्रज), चिक्या लोखंडे (रा. धनकवडी पुणे) आणि त्यांच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. ओंकार थोरात याच्यावर खडक आणि सहकारनगर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचे दोन गुन्हे दाखल आहेत. तर चिक्या लोखंडे याच्यावर सहकारनगर पोलीस ठाण्यात आयपीसी 307 नुसार गुन्हा दाखल आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. त्यांच्यात पूर्वीपासून वाद सुरु होते. याचा राग आरोपींच्या मनात होता. फिर्यादी यांचा मानलेला मोठा भाऊ प्रविण बनसोडे याच्यासोबत थांबायचे. बुधवारी रात्री आरोपी प्रवीणच्या दुकानासमोर येऊन आरोपींनी त्याला शिवीगाळ करुन हातातील धारदार हत्यारे त्याच्यावर उगारली. प्रविणने जीव वाचवण्यासाठी त्या ठिकाणाहून पळ काढला.
आरोपींनी प्रवीणचा पाठलाग करत बुद्धविहारच्या समोर त्याला गाठून हातातील धारदार लोखंडी हत्याराने प्रविण याच्या डोक्यात, मानेवर, दंडावर सपासप वार करुन गंभीर जखमी केले. त्यावेळी परिसरातील नागरिकांनी त्याठिकाणी मोठी गर्दी केली होती. यावेळी आरोपींनी हातातील हत्यारे फिरवून परिसरात दहशत निर्माण केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विवेक सिसाळ करत आहेत.