लोणी काळभोर, (पुणे) : अयोध्या येथील श्रीराम मंदिरात प्रथमच ऐतिहासिक मंगल सोहळ्याची अनुभूती देण्यासाठी पूर्व हवेली सर्व दिंडी समाज आयोजित ‘अयोध्या भव्य रामकथा महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. भारतातील पहिल्या गणेश कथाकार ह.भ.प. रुक्मिणी तारू महाराज यांच्या पुढाकाराने तब्बल दहा दिवस हा कार्यक्रम होणार आहे.
अयोध्या येथील राम मंदिरात मंगळवार (ता. २६) ते गुरुवारी (ता. ४) या कालावधीत या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी पुणे रेल्वे स्थानकातून अयोध्येकडे ३५० व त्यापेक्षा जास्त नागरिक रवाना झाले आहेत. ‘जय जय श्रीराम’चा होणारा जयघोष उपस्थित भक्तांची मिळालेली तितकीच दमदार साथ अन् मुक्तहस्ते फुलांची होणारी उधळण, अशा भावभक्तीपूर्ण वातावरणात भाविकांना शुभेच्छा देण्यात आल्या.
या वेळी माऊली आबा कटके, माऊली काळभोर, अशोक रुपणार, विठ्ठल कुंजीर, मिलिंद कुंजीर, अण्णा बोडके, संपत काकडे, दत्तात्रय तारु, बाळासो कुंजीर, सुमित कुंजीर, ओंकार तारु, नितीन कुंजीर, विठ्ठल कुंजीर, अभिजित तारू, मंगेश कोकाटे, सुमित कुंजीर, मिथुन तारू, अविनाश सोनावणे, रोहिदास गायकवाड आदि उपस्थित होते.
दरम्यान, विधानसभा निवडणूक प्रमुख व शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख माऊली कटके यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमासाठी जाणाऱ्या भाविकांचा रेल्वे व बसचा जाण्या-येण्याचा खर्च केला आहे. रामारायांच्या या उत्सवामध्ये पूर्व हवेलीतील सर्व कीर्तनकार, प्रवचनकार यांच्या दररोज सेवा होणार आहेत. अयोध्येमध्ये रामलल्लाच्या दर्शनासाठी जाण्याचा उत्साह भाविकांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. श्रीराम भक्तांना सुखद प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. अयोध्या दर्शन यात्रेला जाण्याचे स्वप्न पूर्ण होत असल्याने वारकरी बांधवांनी आयोजकांचे आभार मानले.