-दीपक खिलारे
इंदापूर : खासदार शरद पवार हे आमचे विठ्ठल आहेत, ये विठ्ठला आमचे ऐका, इंदापूर विधानसभेच्या जागे संदर्भात घेतलेला निर्णय बदला, अन्यथा आम्ही बंडखोरी केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा सोनाई परिवाराचे सर्वेसर्वा दशरथ माने यांनी आज दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी इंदापूर विधानसभेचा उमेदवार म्हणून हर्षवर्धन पाटील यांची उमेदवारी निश्चित केल्यानंतर, नाराज गटाने परिवर्तन मेळाव्याचे आयोजन बाजार समितीच्या मैदानावर केले होते. त्यावेळी दशरथ माने बोलत होते.
या परिवर्तन मेळाव्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण माने, कर्मयोगी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, कांतीलाल झगडे, बाबासाहेब चवरे, बाळासाहेब हरणावळ, शकील सय्यद, बापू जामदार, अर्शद सय्यद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दशरथ माने म्हणाले, शरद पवार यांनी जाहीर केलेल्या उमेदवारी संदर्भात पुनश्च निर्णय घ्यावा. जर जाहीर करण्यात आलेली उमेदवारी रद्द करून पक्षातील ज्या कार्यकर्त्यांनी उमेदवारीची मागणी केली होती. त्यांच्यापैकी एकाला उमेदवारी द्यावी. अन्यथा सांगली पॅटर्न सारखा इंदापूर तालुक्यातही बंडखोर उमेदवार निवडणुकीमध्ये उभा राहील. 1995 साली बंडखोरी झाली तेव्हा मी स्वतः होतो. त्यामुळे आमच्यासाठी हा निर्णय घेणे नवीन नाही. त्यावेळी हर्षवर्धन पाटील यांना आम्ही निवडून आणले.
पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची 29 सप्टेंबर रोजी बारामती येथील गोविंद बागेमध्ये आम्ही भेट घेतली. भेटीच्या वेळी पवार यांना हात जोडून विनंती केली. हर्षवर्धन पाटील यांना पक्षाची उमेदवारी देऊ नका. हा पट्ट्या तंबूत घुसला तर तंबूच शिल्लक ठेवायचा नाही. आणि तसेच झाले असे माने यांनी सांगताच श्रोत्यांच्यात हास्यकल्लोळ झाला. विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर करून दशरथ मानेंनी आपला आवाज शरद पवारांपर्यंत आणि सुप्रिया सुळे पर्यंत पोहोचवण्याचा अतोनात प्रयत्न केला. इंदापूर मध्ये झालेले बंडखोरीचा परिणाम राज्यभरात होईल, असा इशाराही दशरथ माने यांनी यावेळी दिला.
यावेळी अप्पासाहेब जगदाळे म्हणाले, आमचा आवाज कोणीही थांबू शकत नाही. कारण प्रामाणिकपणा महत्त्वाचा असतो. प्रामाणिकपणा आमच्यात आहे. नेता नसताना इंदापूर तालुक्यातील प्रामाणिक जनतेने खासदार सुप्रिया सुळे यांना 26 हजार मताची आघाडी दिलेली आहे. आता हा पट्ट्या म्हणतो, अदृश्य शक्तीने आघाडी दिली आहे. अरे कोणती रे अदृश्य शक्ती आहे. कोणत्या गावातलं पाणी पिऊन आलाय तुम्ही. स्वर्गीय शंकरराव पाटील तथा भाऊंच्या पुतळ्यासमोर उभे राहून खोटे बोलत आहात. भाऊंना काय वाटले असे याचा जरा तरी विचार करा. तुम्ही घोलप कुटुंबीयांना बाजूला केले. भाऊंची कन्या पद्मा भोसले यांना कारखान्यातून बाजूला केले. शहा कुटुंबीयांना संस्थेपासून दूर केले हे पाप आहे. ही जनता आणि भाऊ कधीही माफ करणार नाही असे जगदाळे म्हणाले.