पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी नृत्यांगना गौतमी पाटीलच्या गाडीमुळे पुण्यात झालेल्या अपघात प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत. पीडित कुटुंबियांनी चंद्रकांत पाटील यांच्या जनता दरबारात न्यायाची मागणी केली असता चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ डीसीपी संभाजी पाटील यांना फोन करत गौतम पाटीलला उचलायचं की नाही? असा थेट सवाल केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

गेल्या महिन्यात (30 सप्टेंबर) वडगाव पुलाजवळ गौतमी पाटीलच्या वाहनाने एका रिक्षाला मागून जोरदार धडक दिली होती. या अपघातात मरगळे नावाचे रिक्षाचालक गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर सध्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू असून, मरगळे कुटूंबियांनी चंद्रकांत पाटील यांच्याकडे जात जनता दरबारात न्याय मागत गौतमी पाटीलला अटक व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, जखमींच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी डीसीपी संभाजी पाटील यांच्याशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी, “गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?” असा थेट प्रश्न विचारत दोषींवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, या अपघातानंतर कार चालक फरार झाला होता, परंतु सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली असून, कार गौतमी पाटीलच्या नावावर असल्याने सिंहगड रोड पोलिसांनी तिला देखील चौकशीसाठी हजर राहण्याबाबत नोटीस पाठवली आहे.







