राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार आज वयाची ८३ वर्षे पूर्ण करून ८४ व्या वर्षात यशस्वीरित्या पदार्पण करत आहेत. यानिमित्ताने राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, दुष्काळ, मराठा आरक्षणासारख्या प्रश्नांमुळे यंदा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला आहे. याबाबत त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.
काटोवाडी ते दिल्ली
‘जाणता राजा’ अशी ओळख असलेल्या शरद पवारांचा जन्म १२ डिसेंबर १९४० रोजी बारामती तालुक्यातील काटेवाडी या छोट्याशा गावात झाला. शरद पवार यांची गणना देशातील प्रभावशाली राजकीय नेत्यांमध्ये केली जाते. शरद पवार यांनी वयाच्या २७व्या वर्षी राजकीय प्रवास सुरु केला. दरम्यान, ५५ वर्षांचा राजकीय अनुभव असलेल्या शरद पवारांनी १९६७ च्या विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून सदस्य म्हणून निवडून आले. मात्र, त्यानंतर पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटेवाडीपासून सुरु झालेला शरद पवारांचा राजकीय प्रवास हा दिल्लीपर्यंत पोहोचला. शरद पवारांनी भारताच्या राजकारणात महत्त्वाच्या भूमिका स्वीकारल्या. त्यांनी संरक्षण मंत्री आणि राष्ट्राचे कृषी मंत्री या दोन्ही पदांवर काम केले. देशाचे भवितव्य घडवण्यासाठी त्यांचे असलेले योगदान कायम अबाधित राहील.
राष्ट्रवादीची स्थापना व राजकारणाचा प्रवास
राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांची राजकीय कारकीर्द मोठी आहे. शरद पवार हे महाराष्ट्राचे तब्बल चार वेळा मुख्यमंत्री पदावर विराजमान होते. त्यांच्या कार्यकाळात अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहे. त्यासह शरद पवार हे दोन वेळा केंद्रीय मंत्रिमंडळात महत्वाच्या खात्याचे मंत्री होते. पी व्ही नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात ते संरक्षण मंत्री होते. तर मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडं कृषी मंत्रालयाची जबाबदारी होती. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर शरद पवार यांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीची स्थापना करण्यात आली. महाविकास आघाडीचे अध्यक्ष म्हणून शरद पवार हे काम करतात. त्यांच्याच नेतृत्वात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात सत्ता स्थापन केली होती. शरद पवार यांनी अनेक वर्षे संसद सदस्य आणि विधानसभेचे सदस्य म्हणूनही काम पाहिले. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, कोरोना महामारीच्या आव्हानात्मक काळात त्यांचा अनुभव अमूल्य ठरला.
राजकारणातील ‘तेल लावलेले पैलवान’
शरद पवार यांना राजकारणातील ‘चाणक्य’ आणि ‘तेल लावलेले पैलवान’ अशा उपाध्या लावल्या जातात. शरद पवार यांनी राजकारणात अनेक नेत्यांवर मात केली आहे. आतापर्यंत शरद पवार हे कोणत्याच आरोपात अडकले नाहीत. कोणत्याही पक्षांच्या राजकीय खेळीला मात देऊन ते राजकारण करतात. त्यामुळे त्यांना ‘तेल लावलेले पैलवान’ असं संबोधलं जाते. आजही शरद पवार कोणती भूमिका घेणार, हे कोणालाही ओळखता येत नाही. मात्र, शरद पवार हे कोणत्याच भूमीकेवर ठाम राहत नसल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येतो.
क्रिकेटमध्येही ‘खेळी’
शरद पवारांनी २००५ ते २००८ पर्यंत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयचे अध्यक्षपद भुषवले. यानंतर त्यांनी २०१० ते २०१२ पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम केले. मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्येही त्यांचा सहभाग होता. दरम्यान, २०१७ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला. देशातील सर्वात प्रतिष्ठित राजकारण्यांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे शरद पवार यांचा वारसा भारताच्या सामाजिक आणि राजकीय जडणघडणीत गुंफलेला आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या वडीलांना खास शुभेच्छा…
शरद पवार यांची कन्या असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांची फेसबुक पोस्ट लक्ष वेधून घेताना दिसत आहे. सुप्रिया सुळे यांनी या पोस्टमध्ये शरद पवार यांच्या सतत कार्यशील राहण्याचे कौतुक करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. संघर्षाच्या या काळात आपण सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करून यशस्वी व्हाल याचा आम्हा सर्वांनाच सार्थ विश्वास आहे, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
पंतप्रधांनी ट्विटद्वारे दिल्या शुभेच्छा…
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अजित पवार काकांची भेट घेणार का?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर शरद पवारांचा हा पहिलाच वाढदिवस आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपूरला सुरू असल्याने अजित पवार गटाचे सर्व मंत्री, आमदार नागपुरात आहेत. दुसरीकडे युवा संघर्ष यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमासाठी शरद पवार देखील नागपूर येथे पोहचले आहेत. राजकारण आणि राजकीय भूमिका एका बाजुला तर कौटुंबिक नातं दुसऱ्या बाजुला अशा प्रकारची संस्कृती पवार कुटुंबाची असल्याचं गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. त्यामुळं शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी राजकारण बाजुला ठेवून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या गटाचे सहकारी मंत्री शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जाणार का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज ८३ वा वाढदिवस आहे. या निमित्ताने नाशिकमध्ये शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते पोहोचले. या वेळी कार्यकर्त्यांनी आणलेला केक शरद पवारांनी कापला. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, मराठा आरक्षणासारख्या प्रश्नांमुळे शरद पवार यंदा वाढदिवस साजरा करणार नाहीत, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. राज्यातील अनेक शहरांत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विविध पद्धतीने वाढदिवस साजरा करत आहेत. दरम्यान, नाशिकच्या दौऱ्यानंतर शरद पवार नागपुरला पोहचले आहेत. युवा संघर्ष यात्रेच्या समारोपीय सभेसासाठी शरद पवार नागपूरला जात आहेत.