– विजय लोखंडे
वाघोली : थेऊर(ता.हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या मालकीची जमीन गट नं. 1, 2 व 41 वर पी एम आर डी पुणे यांनी दि. 2/8/21 रोजी विकास आराखड्यामध्ये बस डेपो, शॉपिंग सेंटर, पार्किंग, टुरिस्ट सेन्टर, कल्चर सेन्टर, टाऊन पार्क या स्वरूपाचे आरक्षण टाकले आहेत. त्यावेळी कारखान्याचे जेष्ठ संचालक पांडुरंग काळे यांनी लेखी स्वरूपात हरकत घेऊन विरोध केला होता.
त्यानुसार दौंडचे आमदार राहुल कुल, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा पिडीसीसी बँकेचे संचालक प्रदीप कंद, बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जगताप, शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रशांत काळभोर, यशवंत कारखान्याचे चेअरमन सुभाष जगताप यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कारखान्याच्या जमिनीवर टाकलेल्या आरक्षणबाबत माहिती दिली. त्यानुसार देवेंद्रजी फडणवीस यांनी तात्काळ दखल घेऊन पी.एम.आर.डी आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांना आरक्षण काढण्याबाबत सूचना दिल्या व पीएमआरडीला निवेदन देण्यास सांगितले होते.
त्यानुसार डॉ.योगेश म्हसे आयुक्तांकडे कारखान्याच्या जमिनीवरील प्रारुप आराखडयामधून वरीलप्रमाणे प्रस्तावित केलेली आरक्षणे कायमस्वरुपी रद्द करण्यात यावी, अशी मागणी पीएमआरडीकडे लेखी निवेदनाद्वारे नवनिर्वाचित संचालक मंडळांनी केली आहे. त्यामुळे त्वरित यशवंत साखर कारखान्याच्या जमिनीवरील आरक्षण रद्द करण्याची मागणी चेअरमन सुभाष जगताप यांनी केली. त्यानुसार आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी सदरची सर्व आरक्षण रद्द करण्याचे आश्वासन दिले. तसेच पीएमआरडीए कडून वाघोली पाणी पुरवठा योजना मंजूर असून पाच वर्षांत पूर्ण झाली नाही. या योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी आयुक्त व भालकर यांना सूचना केल्या आहेत. तसेच राहू रोड ते तांबेवाडी सिमेंट काँक्रिट रस्ता, वाघोली येथील बायफ रोड ते वडजाई सिमेंट काँक्रिट रस्ता करण्याबाबत आयुक्त यांच्याकडे मागणी केली.
यावेळी माजी आमदार बाळा भेगडे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे, चेअरमन सुभाष जगताप, व्हाईस चेअरमन मोरेश्वर काळे, संचालक राहुल घुले, किशोर उंद्रे, मिलिंद काळभोर, सचिन मचाले, संजय सातव पाटील, संदिप सातव, प्रदीप सातव, मनोज जाधवराव यांच्यासह आदी उपस्थित होते.