पुणे : अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे पुण्यात नाट्य संमेलनाचे आयोजन केले आहे. महाराष्ट्रभर आज शतकमहोत्सवी नाट्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या नाट्य संमेलनाचा शुभारंभाचा सोहळा पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आज संध्याकाळी पाच वाजता आयोजित केला आहे. या सोहळ्यास उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांच्या यादीत शरद पवार आणि अजित पवार या दोघांचीही नावे आहेत. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर हे दोघे एकाच व्यासपीठावर येणे टाळत आहेत. त्यामुळे नाट्य संमेलनाच्या शुभारंभाच्या सोहळ्याला शरद पवारांसोबत अजित पवार उपस्थित राहणार का? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
यापूर्वी ७९ वे नाट्य संमेलन पिंपरी-चिंचवड शहरातील मैदानावर झाले होते. त्यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आयोजकाची भूमिका पार पाडली होती. त्याशिवाय दिवंगत शिक्षणमंत्री प्राध्यापक रामकृष्ण मोरे आणि युवा नेते अजित पवार यांनीही संमेलनाची धुरा सांभाळली होती. आता तब्बल २५ वर्षांनंतर शहरात नाट्यसंमेलन होणार आहे. या वेळी नाट्यसंमेलनाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घेतली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर येणे टाळत आहेत. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड येथे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात काका आणि पुतणे एकाच व्यासपीावर येणार का, हा औत्स्युक्याचा विषय आहे. दरम्यान, यापूर्वी दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील अनंतराव पवार इंग्लिश मिडीयम स्कूलच्या नूतन वास्तूच्या उद्घाटन कार्यक्रमाला शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर आले होते. आज याची पुनरावृत्ती होणार का, याची प्रतीक्षा आहे. पुढील काही दिवसांत लोकसभा निवडणुका होणार आहेत. दोन्ही नेते काय बोलणार? याकडे कार्यकर्त्यांच्या नजरा आहेत.
मागील काही दिवसांमध्ये अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या आहेत. अनेकदा दोघांनी एकमेकांवर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे. आता दोघेही एकाच मंचावर भाषण करणार आहेत. या वेळी काय बोलणार?, एकमेकांवर टीका-टिपण्णी करणार का? याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष आहे.