लोणी काळभोर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून सिमेंट भरून चाललेल्या ट्रकचालकाचा ताबा सुटल्याने ट्रक पुलावरून खाली पलटी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील थेऊर फाटा परिसरात शनिवारी (ता. २७) रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात टेम्पोच्या पाठीमागे बसलेल्या हमालाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालक व क्लिनर फरार झाले आहेत.
करण गुरुनाथ देडे (वय-३२, रा. सोरतपवाडी, ता. हवेली) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी करण चा भाऊ दिलीप दमा देडे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, करण देडे हा सिमेंटच्या गाडीवर हमाल म्हणून काम करीत असे. देडे हा नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी कामावर गेला होता. सिमेंट भरून ट्रक डिलिव्हरी देण्यासाठी पुण्याच्या दिशेकडे चालला होता. पुणे सोलापूर महामार्गावरून जात असताना, चालकाचा ताबा सुटला आणि ट्रक कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील थेऊर फाटा परिसरात असलेल्या पुलावरून खाली कोसळला. ट्रक पलटी होऊन महावितरणच्या रोहित्राला जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रकच्या पाठीमागे बसलेला हमाल देडे गंभीर जखमी झाला. तर ट्रकचालक व क्लिनर यांना किरकोळ मार लागला होता. त्यामुळे ते दोघे घटनास्थळावरून पळून गेले.
या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमी हमाल देडे याला तातडीने लोणी काळभोर येथील एका बड्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
दरम्यान, हा अपघात झाल्यानंतर बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे पुणे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, लोणी काळभोर वाहतूक पोलिसांनी वाहतूक कोंडी सुरळीत करून महामार्ग मोकळा केला.
या प्रकरणी करणचा भाऊ दिलीप दमा देडे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार महेश करे करीत आहेत.
महावितरणचे सुमारे १० ते १५ लाखांचे नुकसान
सिमेंटचा ट्रक पुलावरून खाली पडल्यानंतर वड्या जवळ असलेल्या रोहित्रावर जाऊन आदळला. तेव्हा त्या ठिकाणी खूप मोठा स्फोट झाला. या अपघातात डीपी स्ट्रक्चर पोल आणि रोहित्र भुईसपाट झाले. त्यामुळे महावितरणचे सुमारे दहा ते बारा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. महावितरण याबाबत लवकरच लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार देणार आहे.
थेऊर फाटा परिसरात विद्युत पुरवठा खंडित
या अपघातामुळे थेऊर फाटा परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. याचा महावितरणच्या अडीचशे ते तीनशे घरगुती व व्यावसायिक ग्राहकांना फटका बसला आहे. तर महावितरणच्या वतीने विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी जोरदार काम सुरू आहे. हा विद्युत पुरवठा रविवारी संध्याकाळी अथवा सोमवारी सकाळपर्यंत पुर्ववत होण्याची शक्यता आहे, अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून मिळत आहे.