लोणी काळभोर, (पुणे) : थेऊर गणपती मंदिरासमोरील रस्ता खराब झाल्यामुळे, येणारे भाविक व येथे राहणारे ग्रामस्थ यांची, रस्ता करण्याची मागणी होती. याच अनुषंगाने ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निधी मिळण्यासाठी गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा करण्यात आला. त्यामुळे आता ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती थेऊरचे ग्रामपंचायत सदस्य युवराज काकडे यांनी दिली.
अष्टविनायकातील मानाचा गणपती असलेल्या श्रीक्षेत्र थेऊर (ता. हवेली) येथील गणपती मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते मंगळवारी (ता. १६) करण्यात आले. यावेळी काकडे यांनी ही माहिती दिली. तसेच हा रस्ता मंजूर झाल्यामुळे, येणाऱ्या भाविकांना व येथे राहणाऱ्या नागरिकांना याचा फायदा होणार असल्याचे सांगितले.
यावेळी उपसरपंच भाऊसाहेब काळे, राहुल कांबळे, विठ्ठल काळे, शशिकला कुंजीर, संतोष काकडे, संजय काकडे, गणेश गावडे, चंद्रभागा शिर्के, ग्रामविकास अधिकारी तुकाराम पाटील, माजी उपसरपंच दत्तात्रय कुंजीर पाटील, सुखराज कुंजीर, गणेश रसाळ, शहाजी जाधव, आनंद तांबे, बाळासाहेब शेडगे, हेमंत कांबळे, दत्तात्रय शेडगे, मेहबूब सय्यद, भाऊसाहेब कांबळे, संपत बिनावत आदी मान्यवर उपस्थित होते.
यापुढे बोलताना काकडे म्हणाले, “सदर रस्ता खराब झाल्यामुळे येणाऱ्या भाविकांना व येथे राहणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. अनेक ठिकठिकाणी पाणी साचत असल्यामुळे, मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. गेली अनेक दिवसांपासून या रस्त्याचे काम अर्धवट राहिले होते. अखेर महाराष्ट्र शासनाच्या, ग्रामविकास विभागाकडून सदर रस्त्याच्या कामास ५० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. यामुळे चिंतामणी हायस्कूल चौक ते गणपती मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे, सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम होणार आहे. रस्त्याचे काम मंजूर होऊन, तात्काळ सुरू झाल्यामुळे, येणाऱ्या भाविकांनी व येथे राहणारे नागरिक आनंद व्यक्त करीत आहेत.
गाळाधारक व नागरिकांनी, स्वतःहून अतिक्रमण काढावे
“सदर रस्त्याच्या सुरू होणाऱ्या कामामुळे, येणारे भाविक व येथे राहणारे नागरिक यांच्या वाहतुकीत, काही दिवसांसाठी बदल करण्यात येणार आहे. रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत, भाविकभक्त व ग्रामस्थांनी सहकार्य करावे. तसेच या रस्त्यावर असलेली अतिक्रमणे संबंधित गाळाधारक व नागरिकांनी, स्वतःहून काढून घ्यावीत. अन्यथा सर्व अतिक्रमणे मुक्त करण्याची कारवाई करण्यात येईल”.
– ग्रामपंचायत प्रशासन, थेऊर, (ता. हवेली)