राहुलकुमार अवचट
यवत : यवत येथील श्री काळभैरवनाथ मंदिरात श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव व ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण सोहळा निमित्त आयोजित आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची ह.भ.प प्रकाश महाराज साठे (बीड-धारूर) यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली. सप्ताह काळात वेगवेगळ्या विषयांवर विविध नामवंत कीर्तनकारांकडून समाजप्रबोधन करण्यात आले. साठे महाराज यांनी कीर्तनातून आईवडिलांचा सांभाळ करावा, असे आवाहन केले. आईवडिलांची सेवा हाच धर्म असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराजांनी भगवान श्रीकृष्णाने अवतार घेतल्यापासून बालपणी केलेल्या लीलांचे वर्णन त्याचप्रमाणे अवतार संपेपर्यंत जीवनप्रवासावर प्रबोधन केले. यवत ग्रामस्थांच्या वतीने साठे महाराज यांचा सत्कार करण्यात आला. दहीहंडीच्या कार्यक्रमाने व महाप्रसादाने सप्ताहाची सांगता करण्यात आली. यावेळी समस्त ग्रामस्थ मंडळ यवत व श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले होते.
दहीहंडी फोडून भाविकांना महाप्रसाद वाटप
दहीहंडी फोडून भाविकांना काल्याच्या प्रसादाचे वाटप मंगळवारी रात्री बारा वाजता करण्यात आले. श्री काळभैरवनाथ यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. फुलांनी सजविलेल्या गाभारा व मंदिर परिसरात लावलेल्या दिव्यांनी मंदिर परिसर उजळून निघाला होता.
यावेळी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. पालखीतून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेची टाळ मृदुंगाच्या गजरात ग्राम प्रदक्षिणा करण्यात आली. आज सकाळी हभप प्रकाश महाराज साठे यांच्या काल्याचे कीर्तन झाले.
तसेच दहीहंडी फोडून उपस्थित भाविकांना व ग्रामस्थांना महाप्रसाद देवून श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा व श्री ज्ञानेश्वर पारायण सोहळ्याची सांगता करण्यात आली. यावेळी यवत व यवत पंचक्रोशीतील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.