लोणी काळभोर, (पुणे) : 15 ऑक्टोबर 2024 रोजी भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त भारत महासत्ता होण्याचे स्वप्न कलामसाहेबांनी पाहिले, त्याची पूर्तता करण्याचे काम तरुण विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सिद्धीस नेले पाहिजे, असे प्रतिपादन समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. अंबादास मंजुळकर यांनी केले.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित, समाजभूषण गणपतराव काळभोर, महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग व मराठी विभागाच्या वतीने “वाचन प्रेरणा दिन” विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आला. यावेळी ‘वाचन प्रेरणा दिना’च्या समारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या महाविद्यालयाच्या सांस्कृतिक व मराठी विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.
यावेळी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच त्यांच्या जीवन कार्यावर आधारित मराठी विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या भित्तिपत्रिकेचे अनावरण प्राचार्यांच्या हस्ते करण्यात आले.
पुढे बोलताना प्राचार्य मंजुळकर म्हणाले, वाचन संस्कृती विद्यार्थ्यांनी जोपासली पाहिजे, वाढवली पाहिजे. ‘वाचाल तर वाचाल’ हे सूत्र विचारात घेऊन जीवनाच्या वाटेवर पुस्तक वाचनाने ज्ञानात भर पडावी. थोरा मोठ्यांची चरित्र, आत्मचरित्रे यांचे वाचन करून विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपले ध्येय निश्चित करून देशाच्या विकासात योगदान द्यावे. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
दरम्यान, मनीषा दासतोडे, तृप्ती लवांडे, सिद्धी भालसिंग व यश लोंढे या विद्यार्थी- विद्यार्थिनींनी आपली मनोगते व्यक्त केली. ग्रंथालयाच्या वतीने ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले. सूत्रसंचालन प्रेम काळभोर याने केले. प्रस्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा. बाळासाहेब जगताप यांनी केले. आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. विजयकुमार घोडके यांनी मानले.